Mon, Apr 22, 2019 06:16होमपेज › Konkan › लोकसभेसह दापोली विधानसभा जिंकायचीच

लोकसभेसह दापोली विधानसभा जिंकायचीच

Published On: Feb 09 2018 2:00AM | Last Updated: Feb 08 2018 9:44PMखेड : प्रतिनिधी

दापोली विधानसभा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेसने जिंकल्यानंतर आता आगामी विधानसभा व लोकसभेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीला विजय मिळवून द्यायचाच. आगामी काळात जिंकायचेच, असे प्रतिपादन आ. सुनील तटकरे यांनी केले.  मुंबई येथे नुकतीच प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यकर्त्यांची बैठक घेण्यात आली. या बैठकीला दापोली विधानसभा मतदार संघाचे आ. संजय कदम, अजय बिरवटकर यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी दापोली विधानसभा क्षेत्रातील मूळ रहिवासी असलेले मात्र नोकरी-व्यवसायानिमित्त मुंबई, ठाणे, विरार, नालासोपारा आदी भागात वास्तव्य करणारे चाकरमानी मोठ्या संख्येने उपस्थित होते. दापोली विधानसभा मतदारसंघावर राष्ट्रवादीने झेंडा फडकवल्यानंतर आता आगामी कालावधीत होऊ घातलेल्या लोकसभा व विधानसभा निवडणुकीची मोर्चेबांधणी पक्षाकडून सुरू करण्यात आली आहे. त्याचाच भाग म्हणून  बैठक घेण्यात आला. 

या बैठकीला दापोली विधानसभा क्षेत्राध्यक्ष प्रकाश शिगवण, जिल्हा महिलाध्यक्ष चित्रा चव्हाण, खेड तालुकाध्यक्ष स.तु.कदम, दापोली तालुकाध्यक्ष जयवंत जालगावकर, मंडणगड तालुकाध्यक्ष अनिल रटाटे, जिल्हा ओबीसी सेल अध्यक्ष मोहन मुळे, दापोली पंचायत समिती सभापती चंद्रकांत बैकर, मंडणगड नगराध्यक्ष प्रियांका शिगवण, खेड शहराध्यक्ष सतीश चिकणे, जिल्हा परिषद सदस्य सुनील तोडणकर यासह पं. स. सदस्य, नगरसेवक, मुंबई व उपनगरातील कार्यकर्ते उपस्थित होते. दापोली व मंडणगड तालुक्यांतील काही कार्यकर्त्यांची पदाधिकारी म्हणून निवड करण्यात आली.

यावेळी मार्गदर्शन करताना आ. तटकरे म्हणाले, दापोली विधानसभा मतदारसंघ आपण जिंकला आहे. लोकांचे प्रश्न सोडवणारा आमदार आपल्याला मिळाला आहे. त्यामुळे आता लोकसभा मतदारसंघदेखील कार्यकर्ते ताब्यात घेतील यात शंका नाही. शिवशाहीच्या नावाखाली जुन्या गाड्या रस्त्यावर आणून जनतेची फसवणूक केली जात आहे. एसटीची 30 टक्के भाडेवाढ करण्यात आली आहे. शिवसेनेचे मंत्री सरकारच्या विरोधात सरकारमध्ये राहून बोलत आहेत. शिवसेनेचेच आमदार व मंत्री भाजप सरकार विकासासाठी निधी देत नसल्याचे सांगत असताना काही मंत्री कोट्यवधीचा निधी आणल्याच्या थापा मारत आहेत. हे जनतेने ओळखले असल्याने विधानसभा मतदार संघापाठोपाठ आता कोकणातील रायगड लोकसभा मतदारसंघ देखील राष्ट्रवादीच्या ताब्यात येईल, असा विश्‍वास त्यांनी व्यक्‍त केला.

यावेळी राष्ट्रवादीच्या तालुकाध्यक्षांना नवीन वाहने देण्यात आली. खेड तालुक्यातील म्हाळुंगे कांगणेवाडी व गोलमडेवाडी येथील कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीमध्ये जाहीर प्रवेश केला.