Tue, Jun 25, 2019 15:09होमपेज › Konkan › कोकण विकासाचा बॅकलॉग भरून काढू

कोकण विकासाचा बॅकलॉग भरून काढू

Published On: Jan 12 2019 1:32AM | Last Updated: Jan 12 2019 12:31AM
खेड : प्रतिनिधी

केंद्रीय अवजड उद्योगमंत्री अनंत गीते यांनी मतदारसंघात किती कामे केली? निधी आणण्यासाठी धमक असावी लागते. सेनेचे तीन मंत्री कोकणात आहेत. मात्र, कारखानदारांना धमकावण्याचे प्रकार सुरू आहेत. गुंडगिरी, दहशत वाढली आहे. त्यामुळे कोकणचा बॅकलॉग भरून काढण्यासाठी परिवर्तन करा. आघाडीला पाठबळ द्या, असे आवाहन  राष्ट्रवादीचे नेते आ. अजित पवार यांनी केले. 

खेड येथील राष्ट्रवादीच्या निर्धार परिवर्तन यात्रेमध्ये शुक्रवारी (दि. 11) रोजी सकाळी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर ज्येष्ठ नेते छगन भुजबळ, विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आ. जयंत पाटील, सुनील तटकरे, आ. भास्कर जाधव, आ. संजय कदम, प्रवक्ते नवाब मलिक, जिल्हाध्यक्ष बाबाजी जाधव व पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी आगामी निवडणुकीत परिवर्तन करण्याचा निर्धार राष्ट्रवादी कार्यकर्त्यांनी केला.

यावेळी अजित पवार म्हणाले, शिवसेनेला निवडणुका जवळ आल्यानंतर अयोध्येत राम मंदिर बांधण्याची भाषा सूचली. हे सरकार गेलेच पाहिजे. मागच्या दाराने आणीबाणी आणण्याचा त्यांचा डाव आहे. आम्ही आघाडीत असताना फसव्या घोषणा केल्या नाहीत. जनतेने आम्हाला विरोधात बसण्याचा आदेश दिला. तो आदेश आम्ही पाळत आहोत. आमच्या काळात शेतकर्‍यांना 71 हजार कोटींची कर्जमाफी झाली. दोन टक्के व्याजाने कर्जपुरवठा करण्यात आला. मात्र, सध्याच्या सरकारने पीक विमा योजनेत राफेलपेक्षा मोठा घोटाळा केल्याचा गौप्यस्फोट पवार यांनी केला. आज सरकार विरोधात बोलणार्‍यांना धाकात ठेवले जात आहे. या आधीचे अवजड उद्योगमंत्री प्रफुल्ल पटेल होते. त्यांनी त्यांच्या काळात ‘सीएसआर’मधून मतदारसंघात मोठी कामे केली. मात्र, ती ताकद येथील मंत्र्यांमध्ये नाही. सत्ताधार्‍यांच्या डोक्यात लोकशाही नसून हुकूमशाही आहे. त्यामुळे कोकणच्या विकासाचा बॅकलॉग भरुन काढण्यासाठी सर्वांनी आघाडीच्या बाजूने उभे राहा, असे आवाहन केले.

यावेळी सुनील तटकरे म्हणाले, आता कोकणचा विकास थांबला आहे. मच्छीमार, फळ बागायतदार यांचे प्रश्‍न कायम आहेत. कोकणला झुकते माप देण्याचा प्रयत्न आपण नेहमी केला. येथून निवडून गेलेले गीते हे महामार्गावर टोल बसविण्याबाबत सांगत आहेत. त्यामुळे जनतेने टोल न भरण्याचा निर्णय घ्यावा. त्यामुळे आता परिवर्तन करण्यासाठी एकत्र काम करू, असे आवाहन केले. 

यावेळी छगन भुजबळ यांनी देखील मोदी सरकारवर सडकून टीका केली. राष्ट्रवादी पदाधिकार्‍यांनी निर्धार परिवर्तन यात्रेमध्ये कोकण विकासासाठी आघाडीच्या बाजूने उभे राहा, असे आवाहन केले.