Fri, Apr 26, 2019 01:44होमपेज › Konkan › खासदारकी मिळो न मिळो, रिफायनरी होऊ देणार नाही : नीलेश राणे

खासदारकी मिळो न मिळो, रिफायनरी होऊ देणार नाही : नीलेश राणे

Published On: Feb 10 2018 1:32AM | Last Updated: Feb 10 2018 1:32AMचिपळूण : प्रतिनिधी

रत्नागिरी जिल्ह्यातील जनतेने शिवसेनेवर प्रेम केले. त्या बदल्यात जनतेला यांनी काय दिले, असा रोखठोक सवाल माजी खासदार नीलेश राणे यांनी गुरुवारी नाणार येथे केला व जिल्ह्यातील जनतेला गृहीत धरून राजकारण करण्याचे उद्योेग समुद्रात बुडवून टाकू. महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाच्या हातामध्ये सूत्रे द्या,  मला खासदारकी मिळो न मिळो; पण नाणार रिफायनरीला हद्दपारच करू, असे अभिवचन त्यांनी यावेळी दिले.

सागवे येथे प्रकल्पग्रस्तांच्या आंदोलनाला बळ देण्यासाठी महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाने ‘रिफायनरी हटाओ’साठी निर्धार मेळावा घेतला होता. या मेळाव्याला पंधरा गावांतील जनतेने अभूतपूर्व प्रतिसाद दिला. या मेळाव्यात नीलेश राणे यांनी जोरदार भाषण केले. कोकणावर प्रदूषणकारी प्रकल्प लादण्याच्या भूमिकेचा खरपूस समाचार घेताना सेनेवर जोरदार प्रहार केले. कोकणच्या जनतेने तुमच्यावर इतके प्रेम केले, त्याची उतराई म्हणून अशा प्रदूषणकारी प्रकल्पांना आमंत्रण देता. खासदारकीची आपल्याला पर्वा नाही. ती मिळो, न मिळो. पण जीव गेला तरी प्रकल्प होऊ देणार नाही, अशी परखड भूमिका यावेळी त्यांनी मांडली. 

सेनेचे राज्यात 22 खासदार आहेत. पण संसदेत एकाचेही तोंड उघडत नाही.  सेनेचे आमदार राजन साळवी मुंबईत राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांना भेटून समृद्धीच्या धर्तीवर मोबदला देण्याची मागणी करतात. सेनेने सौदी अरेबियाच्या कंपनीशी 2016 सालीच करार करून ठेवला होता. रामदास कदम यांच्या पर्यावरण मंत्रालयाने या प्रकल्पाला मंजुरी दिली आहे. हा सगळाच प्रकार हास्यास्पद व जनतेला भ्रमित करणारा आहे. आता सेनेवाले इथे येऊन प्रकल्पाला विरोध करतात. पण सेनेमध्ये वा रामदास कदम यांच्यामध्ये या प्रकल्पाला विरोध करण्याची धमकच नाही. ती केवळ नारायण राणे यांच्यात असल्याचे नीलेश राणे यांनी सांगितले.

जैतापूर, दाभोळ या दोन्ही प्रकल्पांना सेनेने अगोदर विरोधच केला. ‘इको सेन्सिटिव्ह’ शंभर दिवसांत रद्द करणार होते. आता ही रिफायनरी बुडविण्याची भाषा सेनेवाले करीत आहेत. या लोकांनाच आता जनतेने बुडविण्याची वेळ आली आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. नीलेश राणे यांनी कोकणचा र्‍हास करण्याचा हा राजकीय कट असल्याचा आरोप केला. सिंधुदुर्गात आम्ही असल्या प्रकल्पांना थारा दिला नाही. रत्नागिरीतही तेच धोरण ठेवू. पर्यटन हाच आर्थिक विकासाचा गाभा आहे. त्या द‍ृष्टीने महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष अजेंडा राबविणार आहे.

एकतर सेनेच्या उद्योगमंत्र्यांनी कोकणात किती प्रकल्प आणले? तुमच्यात तेवढी कुवत नसेल तर येथील कष्टकरी शेतकरी व मच्छीमार शेती व मत्स्य व्यवसायातून रोजगार करत आहे. त्याच्या पोटावर लाथ मारू नका. एवढे किमान करा. 2019 च्या निवडणुकीत सगळ्या प्रश्‍नांची उत्तरे जनता सेनेवाल्यांना देणार आहे. जनतेला भ्रमित करायचे व गृहीत धरायचे सगळे उद्योग पुढील निवडणुकीत जनता बंद पाडणार आहे, असा टोलाही त्यांनी हाणला.