Wed, Apr 24, 2019 15:30होमपेज › Konkan › सावंतवाडी-गरड भागात तीव्र पाणीटंचाई

सावंतवाडी-गरड भागात तीव्र पाणीटंचाई

Published On: Apr 24 2018 11:17PM | Last Updated: Apr 24 2018 11:10PMसावंतवाडी ः प्रतिनिधी

सावंतवाडी शहरामध्ये गरड भागात तीव्र पाणीटंचाईची झळ नागरिकांना बसत असून प्रशासनाचा भोंगळ कारभार आणि लोकप्रतिनिधींच्या दुर्लक्षामुळे ही पाणीटंचाई उद्भवली असून नागरिकांना टँकरद्वारे पाणीपुरवठा करावा, अशी मागणी पाणीपुरवठा समितीचे माजी सभापती विलास जाधव यांनी केली आहे. 

या पाणीटंचाईमुळे शहरात चौवीस तास पाणीपुरवठ्याचा दावा फोल ठरला असून येत्या एक दोन दिवसात पाणीटंचाईमुळे त्रस्त झालेले नागरीक सावंतवाडी नगरपरिषदेवर धडकणार असल्याचा इशारा जाधव यांनी दिला आहे. 

शहराच्या गरड - माजगाव भागामध्ये सुमारे 25 ते 30 कुटुंबीयांना सद्यस्थितीत तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागत असून पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात ही परिस्थिती उद्भवली आहे. अद्याप मे महिना शिल्‍लक असून या पाणीटंचाईवर मात करण्यास प्रशासनाकडून चालढकलपणा केला जात असल्याचा आरोप जाधव यांनी केला आहे.

या कुटुंबाना टँकरद्वारे पाणीपुरवठा करावा, अशी मागणी त्यांनी केली आहे. यापूर्वी स्थायी समितीमध्ये आपण नगरपरिषदेच्या वैशिष्ट्यपूर्ण  योजनेत 3 लाख रुपयांची पाणी साठवण टाकी बसविण्याचा प्रस्ताव  नगराध्यक्ष  बबन साळगावकर यांच्यासमोर ठेवला होता. परंतु, प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केल्यामुळे ही पाणीसाठवण टाकी बसविण्यात आलेली नाही. परिणामी गरडवासीयांना पाणीटंचाईच्या झळा जाणवू लागल्या आहेत. ही पाणीटंचाईची तीव्रता कमी होण्यासाठी प्रशासनाने आता तरी पावले उचलावीत, अशी मागणी विलास जाधव यांनी केली आहे.