Thu, Jul 18, 2019 02:04होमपेज › Konkan › पाणीटंचाईग्रस्त गावे शंभरी गाठणार

पाणीटंचाईग्रस्त गावे शंभरी गाठणार

Published On: Jan 17 2018 1:58AM | Last Updated: Jan 16 2018 9:58PM

बुकमार्क करा
रत्नागिरी : प्रतिनिधी

गतवर्षी सरासरी गाठताना पावसाची झालेली दमछाक, जलयुक्‍त शिवार योजना राबविताना आलेल्या तांत्रिक अडचणी आणि कागदावरच उद्दिष्टपूर्तता केलेल्या वनराई बंधार्‍यांमुळे यंदाच्या उन्हाळ्यात जिल्ह्यातील पाणीटंचाईग्रस्त गावांची संख्या शंभरच्या घरात पोहोचणार आहे. या गावांसाठी 21 टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यासाठी दीड कोटींचा संभाव्य पाणीटंचाई आराखडा प्रस्तावित करण्यात आला आहे. यामध्ये जिल्ह्यातील पाणी योजनांच्या दुरुस्तीसाठी सव्वाशे कोटींचा समावेश करण्यात आला आहे. 

‘नेमेची येतो पावसाळा...’ या उक्‍तीप्रमाणे जिल्ह्यात दरवर्षी पाणीटंचाई भेडसावते. यासाठी जिल्हा प्रशासनाने 2019पर्यंत जिल्हा टँकरमुक्‍तीच्या उद्देशाने विविध योजना राबविल्या. यामध्ये जलयुक्‍त शिवार योजनेमध्ये या वर्षी 47 गावांचा समावेश करण्यात आला आहे. मात्र, या योजना राबविताना आलेल्या तांत्रिक अडचणींमुळे या वर्षी त्यांपैकी 50 टक्के योजनाच कार्यान्वित होणार आहेत. त्यामुळे  समाविष्ट असलेली गावे टंचाईग्रस्तच राहणार आहेत. गतवर्षी पावसाने सरासरी गाठली. मात्र, 2016च्या तुलनेत हजार मिमीने पाऊस पिछाडीवर राहिल्याने यंदा उन्हाळ्यात पाणीटंचाई आहे. मात्र, त्यासाठी  मार्च महिना उजाडणार असा अंदाज बांधला जात होता. सध्याचे तापमान पाहता जिल्ह्यात फेब्रुवारीतच  टँकर धावण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

पाऊस ओसरल्यानंतर  वनराई बंधारे उभारण्याचे उद्दिष्ट कागदावरच  राहिले आहेत. त्यामुळे यंदाच्या उन्हाळ्यात जिल्ह्यातील टंचाईग्रस्त गावांची मजल शंंभरीपर्यंत जाण्याची शक्यता आहे. त्यासाठी 98 गावांचा टंचाईग्रस्त आराखडा जिल्हा प्रशसनाकडे पाठविण्यात आला आहे. त्यासाठी दोन कोटी 65 लाखांची तरतूद अपेक्षित आहे. जिल्ह्यातील विहिरींच्या दुरुस्तीसाठी आणि पाणी योजनांच्या दुरुस्तीकरिता एक कोटी 25 लाखांची तरतूद प्रस्तावित करण्यात आली आहे तर एक कोटी 45 लाख रुपये  20 टँकरसाठी प्रस्तावित करण्यात आले आहेत.