Fri, Nov 16, 2018 02:24होमपेज › Konkan › कुणी पाणी देता का... पाणी?

कुणी पाणी देता का... पाणी?

Published On: May 31 2018 1:39AM | Last Updated: May 31 2018 12:37AMशिरगाव : संतोष साळसकर

 चाफेड-गावठणवाडीत गेल्या दोन महिन्यापासून तीव्र पाणी टंचाई निर्माण झाली आहे. गेली कित्येक वर्षे या भागात ग्रामस्थांना मार्च महिन्यापासून पिण्याच्या पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे. कुणी पाणी देता का... पाणी? अशी म्हणण्याची परिस्थिती निर्माण झाली असून पाण्यासाठी मैलान्मैल पायपीट करावी लागत आहे.

चाफेड-गावठण हा भाग डोंगराळ भागात वसलेला आहे. पलिकडे नदी असून मध्ये डोंगर असल्यामुळे या नदीचा लोकांना काही उपयोग होत नाही. मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून ग्रामस्थांना तीव्र पाणीटंचाईस समोरे जावे लागते.गावठणमधील सर्व विहिरींनी केव्हाच तळ गाठला. या भागातील राष्ट्रीय पेयजल योजनेंतर्गत बांधण्यात आलेली विहीरदेखील साफ आटून गेली. पिण्याच्या पाण्यासाठी, आंघोळीसाठी, कपडे धुण्यासाठी, गुरांना पिण्यासाठी, लग्नसराईसाठी पाणी आणताना फार मोठी तारेवरची कसरत ग्रामस्थांना करावी लागत लागते.

नळयोजना मंजूर आहे, पण...
चाफेड-गावठणसाठी खा. विनायक राऊत यांच्या प्रयत्नाने नळपाणी योजना मंजूर झाली आहे. सदर योजनेचे रितसर भूमिपूजनही करण्यात आले. मात्र सध्या चाफेड  गावात ग्रामपंचायत स्थलांतराच्या विषयावरुन नळयोजनेचे काम बंद पाडल्याने टंचाईस सामोरे जावे लागत आहे.

प्रत्येकजण सकाळी 5 वाजल्यापासून रांगा लावून हे पाणी भरून घेऊन जातो. त्यामुळे चाफेड-गावठणवासीयांनी साळशी सरपंच वैभव साळसकर यांनी तात्पुरत्या स्वरुपात पाण्याची सोय केल्याबद्दल समाधान व्यक्त केले जात आहे.तसेच साळशी-झरीचीवाडी येथील दादा नाईक आणि विनायक नाईक या बंधुंनी आपल्या खासगी विहिरीद्वारे पंप लावून गावठणवासीयांना पिण्यासाठी पाण्याची सोय केली 
आहे. 

दरम्यान, गेली 30 वर्षे चाफेड-गावठणमधील ग्रामस्थांना पाणी टंचाईस सामोरे जावे लागत असून जोपर्यंत ग्रामस्थांना कायमस्वरुपी स्वतंत्र पाण्याची सोय होत नाही तोपर्यंत दरवर्षी पाण्यासाठी दाहीदिशा भटकावे लागणार आहे. त्यामुळे टंचाईच्या प्रश्‍नावर ग्रा.पं.ने कायमस्वरुपी उपाययोजना करावी, अशी मागणी होत आहे.

साळशीवासीयांची मेहरबानी...
सध्या पाण्यासाठी दाहीदिशा वणवण भटकत असलेल्या गावठणवासीयांना साळशी ग्रा.पं.ने मदत केल्याने निदान पिण्यासाठी तरी पाणी मिळत आहे. साळशीच्या नळपाणी योजनेच्या पाण्याची टाकी ओव्हर फ्लो होऊन वाहत आहे. हे वाहून जाणारे पाणी साळशी सरपंच वैभव साळसकर यांनी पाईप लावून दिल्याने या पाण्यावर चाफेड-गावठणवासीयांची सध्या गुजराण होत आहे.