Mon, May 20, 2019 22:12होमपेज › Konkan › ...तर कोकण पाणीटंचाईमुक्‍त होईल

...तर कोकण पाणीटंचाईमुक्‍त होईल

Published On: Feb 24 2018 1:14AM | Last Updated: Feb 23 2018 9:10PMराजापूर : प्रतिनिधी

कोकणात पाण्याची कमतरता नाही, कमतरता आहे ती नियोजनाची, वाहून जाणारे पाणी साठविण्यासाठी योग्य नियोजन नसल्याने दरवर्षी टंचाईचा सामना करावा लागतो. टंचाईचा प्रश्‍न कायमस्वरूपी सोडविण्यासाठी डोंगरमाथ्यापासून पायथ्यापर्यंत पाणी थांबविण्यासाठी विविध उपाययोजना करणे गरजेचे आहे. हे करण्यामध्ये लोकांचा सहभाग लाभल्यास निश्‍चितच पाणीटंचाईतून मुक्‍तता होईल, असा विश्‍वास डॉ.उमेश मुंडले यांनी व्यक्‍त केला. 

जलपुरूष डॉ. राजेंद्रसिंह यांच्यासोबत काम करणारे पर्यावरण, पाणी व शेती विषयक सल्‍लागार डॉ.उमेश मुंडले यांनी राजापुरातील काही गावांची पाहणी करून त्याठिकाणी जलसंधारणासाठी काय उपाय योजना करता येथील याची चाचपणी केली. राजापूर नगरपरिषदेचे पाणीपुरवठा सभापती गोविंद चव्हाण यांच्या माध्यमातून डॉ.मुंडले यांनी शहरातील जलस्रोतांचीही पाहणी केली. त्यानंतर बुधवारी सायंकाळी आयोजित एका कार्यक्रमात त्यांनी टंचाई निवारणासाठी कसे नियोजन करता येतील याबाबत माहिती दिली.

जलसंधारणासाठी शासनाकडून सर्वच ठिकाणी सारख्या उपाययोजना राबवत आहेत. मात्र, सर्व ठिकाणी पडणारा पाऊस वेगळा आहे, तेथील भौगोलिक रचना वेगळी आहे, त्यामुळे शासनाच्या योजना अयशस्वी ठरताना दिसत आहेत. त्यामुळे जलसंधारणासाठी त्या-त्या भागातील भौगोलिक रचना लक्षात घेणेही तितकेच आवश्यक असल्याचे डॉ.मुंडले यांनी सांगितले. कोकणात बंदिस्त सिमेंट बंधारे बांधल्यास याठिकाणी मोठ्या प्रमाणात पडणारा पाऊस आणि तीव्र उतार यामुळे मोठ्या प्रमाणात माती वाहून येते आणि त्यामुळे काही वर्षांतच बंधारे मातीने भरून जातात. त्यामुळे याठिकाणी व्हेंट बंधारे म्हणजे मध्ये पाणी जाण्यासाठी पाईप ठेऊन बंधारे बांधल्यास पावसाळ्यात माती वाहून जाईल आणि उन्हाळ्यात पाईप बंद केल्यानंतर पाणी साठेल, असे त्यांनी सांगितले. 

तालुक्यात उतार जास्त असल्याने विहिरीतील पाणीही उन्हाळी हंगामात आटते. त्यामुळे भूमिगत बंधारे बांधल्यास विहिरींच्या पाणी साठवण क्षमता वाढविता येते. तसेच उतारामुळे पाण्यासोबत मातीही मोठ्या प्रमाणात वाहून जाते, हाही मोठा  धोका याठिकाणी आहे. त्यामुळे डोंगराच्या माथ्यापासून पायथ्यापर्यंत उपाययोजना केल्यास मातीसोबत पाणीही थांबण्यास मदत होईल. जलसंधारणामध्ये लोकांचा सहभाग अत्यंत महत्त्वाचा आहे. सामान्य माणूस जोपर्यंत हालचाल करत नाही, तोपर्यंत पाणी मिळणार नाही. राजापूर शहराला पाण्याची कमतरता पडणार नाही, एवढे जलस्त्रोत याठिकाणी आहेत. पाण्याचे योग्य नियोजन केल्यास शहर कायमस्वरूपी टंचाईतून मुक्‍त होईल असा विश्‍वासही त्यांनी यावेळीव्यक्‍त केला. 

या कार्यक्रमाला माजी आमदार गणपत कदम, भाजप तालुकाध्यक्ष अनिल करंगुटकर, नगरसेवक पूजा मयेकर, मनीषा मराठे, स्नेहा कुवेसकर, माजी नगरसेवक अभय मेळेकर, प्रतिभा मराठे, जगदीश पवार, मोहन घुमे, नाना कुवेसकर, नगरपरिषदेचे मुख्य लिपिक किशोर जाधव, भाजपचे विस्तारक हर्षल लेले, अनुलोम संस्थेचे मंगेश मोबारकर आदी उपस्थित होते.