Tue, Mar 26, 2019 02:09होमपेज › Konkan › चिपळुणातील तीन गावांवर पाणी-पाणी करण्याची वेळ

चिपळुणातील तीन गावांवर पाणी-पाणी करण्याची वेळ

Published On: May 03 2018 11:22PM | Last Updated: May 03 2018 11:14PMचिपळूण : खास प्रतिनिधी

नांदिवसे प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेचे पाणी तत्काळ सुरू करा, अशा  पंचायतराज समितीने दिलेल्या आदेशाला जिल्हा परिषदेने वाटाण्याच्या अक्षता लावल्या आहेत. ‘पीआरसी’ने याबाबत जि.प.च्या मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांना आदेश दिला होता. त्यानुसार प्रस्ताव तयार केला. मात्र, जि. प. अध्यक्षांनी या प्रस्तावावर अद्याप स्वाक्षरी केलेली नाही. यामुळे कळकवणे, वालोटी, ओवळी येथील ग्रामस्थांवर पाण्यासाठी वणवण करण्याची वेळ आली आहे.

दसपटी विभागातील नांदिवसे प्रादेशिक पाणी योजनेची वीज जोडणी महावितरणने तोडली. त्यानंतर तीन गावांमधील पाणीपुरवठा ठप्प झाला आहे. वीज बिलातील फरकाची थकबाकी जि.प.ने भरावी आणि पाणीपुरवठा सुरळीत करावा, या मागणीसाठी ग्रामस्थांनी ‘पीआरसी’च्या दौर्‍याच्या निमित्ताने पंचायत समितीसमोर उपोषण केले. यावेळी पंचायतराज समितीच्या चिपळुणात आलेल्या सदस्यांनी उपोषणकर्त्यांची भेट घेतली.

 चिपळूण दौर्‍याचे प्रमुख आ. बाळाराम पाटील यांनी या प्रकरणी दखल घेत पीआरसी दौर्‍याच्या समारोपात प्रश्‍न निकाली काढू, असे आश्‍वासन दिले. 

त्यानुसार पीआरसीच्या दौरा समारोपात येथील जि. प. प्रशासनाला समितीने ग्रामस्थांचा पाण्याचा प्रश्‍न पहिला सोडवा, असा आदेश दिला आणि त्या संदर्भात प्रस्ताव करण्याची सूचना केली. या सूचनेनुसार जि. प.चे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी बामणे यांनी संपूर्ण प्रस्ताव तयार केला. मात्र, या प्रस्तावावर जि. प. अध्यक्षांनी स्वाक्षरीच केलेली नाही. यामुळे तीन गावातील ग्रामस्थांवर पाणी-पाणी करण्याची वेळ आली आहे. 
या संदर्भात सभापती पूजा निकम, पं. स. सदस्य नितीन ठसाळे, बाबू साळवी आदींनी गुरुवारी जि. प. प्रशासनाची भेट घेतली. यावेळी हा प्रकार उघडकीस आला. महावितरण अधिकार्‍यांचीही त्यांनी भेट घेतली. मात्र, महावितरणने वीज बिल भरल्याशिवाय  वीज जोडणी होणार नाही, असे स्पष्ट केले. मात्र, जि. प.मध्ये प्रस्तावावर स्वाक्षरीच न झाल्याने ऐन उन्हाळ्यात ही योजना अडचणीत आली आहे.