Fri, Aug 23, 2019 21:07होमपेज › Konkan › जल आराखड्यामुळे  भविष्यासाठी पाण्याचे नियोजन : उदय चौधरी

जल आराखड्यामुळे  भविष्यासाठी पाण्याचे नियोजन : उदय चौधरी

Published On: Jan 31 2018 10:55PM | Last Updated: Jan 31 2018 10:07PMओरोस : प्रतिनिधी

दक्षिण कोकण पाटबंधारे विभागामार्फत तयार करण्यात येत असलेला राज्यजल आराखडा हा भविष्यातील पाण्याचे नियोजन ठरविणारा आहे. या आराखड्यात सिंधुदुर्ग-कोल्हापूर जिल्ह्यातील आठ तालुक्यातील 533 गावांचा समावेश करण्यात आला असून 519 हजार 604 हेक्टर क्षेत्र निवडण्यात आले आहे. भविष्यातील पाण्याचे नियोजन या आराखड्याच्या माध्यमातून होणार असून याबाबत लोकप्रतिनिधी, ग्रामस्थ, सरपंच, पाणी वापर संस्था यांच्या काही सूचना असल्यास त्या आठ दिवसात द्याव्यात, असे आवाहन जिल्हाधिकारी उदय चौधरी यांनी केले. 
सिंधुदुर्गनगरी येथील जिल्हाधिकारी कार्यालयात कोकण पाटबंधारे विकास महामंडळाच्या माध्यमातून एकात्मिक राज्य जल आराखडा जनसुनावणी कार्यक्रम जिल्हाधिकारी उदय चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली झाला.  कार्यक्रमाचे उद्घाटन निवृत्त कार्यकारी संचालक तथा तज्ज्ञ सल्लागार भा.च. कुंजीर यांच्या हस्ते झाले.  निवासी उपजिल्हाधिकारी विजय जोशी, अधीक्षक अभियंता मिलिंद नाईक, राजन डवरी, श्री. धाकतोडे, जीवन प्राधिकरणचे रमेश मठकर आदींसह पाणी वापर संस्था प्रतिनिधी, चेअरमन, सरपंच, अधिकारी, कर्मचारी, ग्रामस्थ उपस्थित होते. 
उदय चौधरी पुढे म्हणाले, या जल आराखड्यामध्ये पुढील 20 वर्षाच्या पाणी साठविण्याचे नियोजन करण्यात येणार असून यामध्ये जि.प.च्या माध्यमातून करण्यात येणारे वळवणी बंधारे, जीवन प्राधिकरणचे तलाव, कालवे यांचा समावेश करण्यात येणार असल्याचे सांगितले. या आराखड्यात पाणी साठवण्यासंदर्भात लोकप्रतिनिधींची काही सुचना असल्यास त्यांनी त्या कराव्यात, असे आवाहन केले. 

निवासी जिल्हाधिकारी विजय जोशी म्हणाले, जिल्ह्यात भूगर्भातील पाण्याची पातळी खालावू लागल्याने टँकरमुक्त जिल्ह्यात टँकरसदृश्य स्थिती निर्माण होवू लागली आहे. यासाठी पाण्याचे नियोजन महत्वाचे आहे. भविष्यातील लोकसंख्येच्या दृष्टीने भूजल साठा महत्त्वाचा असून त्यासाठी काही सूचना मांडावयाच्या  असल्यास त्यांनी येत्या आठ दिवसात लेखी स्वरूपात सादर कराव्यात असे सांगितले.  

यावेळी पाणी वापर संस्थांनी आपल्या समस्या मांडल्या. जिल्ह्यात 26 तलाव असून काही धरणे गाळांनी भरली आहेत. त्यांचा गाळ काढावा. यामुळे पाणी वापर संस्था अडचणीत येतात. वाहून जाणारे पाणी कसे थांबेल याचा विचार व्हावा. फुकेरी धरण कालवे व्हावेत यासह विविध समस्या, सूचना माजी पं.स.सभापती व धामापूर संस्थेचे चेअरमन राजेंद्र परब यांच्यासह पाणी वापर संस्था प्रतिनिधी, पदाधिकार्‍यांनी केल्या.

तज्ञ सल्लागार भा.चं. कुंजीर यांनी पाण्याचे भविष्यकालीन नियोजन या आराखड्यात करण्यात येणार आहे. विदर्भ, मराठवाड्यापेक्षा कोकणात विपुल पाणी आहे. परंतु पाण्याच्या योग्य वापरासाठी नियोजनाची गरज आहे. येथील भौगोलिक स्थिती, हवामान, डोंगर रचना याबरोबर बदलत्या गरजा लक्षात घेतल्या पाहीजेत. 2030 पर्यंतचा हा आराखडा परिपूर्ण बनविण्यासाठी सर्वांचे सहकार्य महत्वाचे असल्याचे सांगितले. 

जीवन प्राधिकरणचे कार्यकारी अभियंता रमेश मठकर यांनीही आपले विचार मांडले. कोल्हापूर, सिंधुदुर्गातील आठ उपखोर्‍याचे 8 तालुक्यातील 533 गावाचे जलआराखडा चित्रफितीचे अधीक्षक अभियंता मिलिंद नाईक यांनी सादर केली. आभार आरेखक कोळसुलकर यांनी मानले.