Thu, Jun 27, 2019 18:20होमपेज › Konkan › विघ्रवली,काटवली ग्रामस्थ पाण्यासाठी एकवटले

विघ्रवली,काटवली ग्रामस्थ पाण्यासाठी एकवटले

Published On: May 24 2018 1:32AM | Last Updated: May 23 2018 10:21PMदेवरूख : प्रतिनिधी

संगमेश्वर तालुक्यात भविष्यातील पाणी प्रश्‍न सोडवण्यासाठी नाम फाऊंडेशनने पुढाकार घेतला आहे.सोनवी नदीतील 7 कि. मी. अंतरातील गाळ काढण्यासाठी विघ्रवली, काटवलीमधील युवावर्गासह ग्रामस्थांनी पुढाकार घेतला आहे. बुधवारी सकाळी या कामाचा शुभारंभ करण्यात आला.

यावेळी ‘नाम’चे कोकण विभाग प्रमुख समीर जानवलकर, तालुका प्रतिनिधी भगवतसिंह चुंडावत, सरपंच संपदा भुरवणे, माजी सरपंच सुचिता पाचकुडवे, पत्रकार प्रमोद हर्डीकर,प्रा. कमलाकर इंदुलकर, शंकर धामणे, संकेत पाचकुडवे आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते. सोनवी नदीतील गाळ काढण्याचा यावेळी शुभारंभ करण्यात आला.

यावेळी या मोहिमेसाठी पुढाकार घेणारे प्रा. कमलाकर इंदुलकर म्हणाले, सोनवी नदी व आजुबाजूच्या पाण्याचे स्रोत आम्ही पाहिले असून भविष्यात पाणी टंचाई उद्भवू नये म्हणून हा गाळ काढत आहोत, हे नमूद केले. विघ्रवली, काटवली परिसरात विहिरी, नाले यांची आम्ही पाहणी करून स्वच्छता मोहीम राबवली. पाण्याच्या पातळीची नोंद करून ठेवली आहे, असे स्पष्ट केले. सोनवी नदीचा श्वास मोकळा करणार असल्याचे इंदुलकर यांनी यावेळी सांगितले.

रविवारी दोन्ही गावातील ग्रामस्थांनी  श्रमदान केले. यात मोठ्या प्रमाणात गाळ उपसा करण्यात आला. या नदीच्या गाळ उपसा मोहिमेत सुशिक्षित युवकांचा सहभाह लक्षवेधी होता. संगणक ज्ञानाचा उपयोग करून या युवकांनी या मोहिमेत चांगले योगदान दिले आहे. नाम संस्थेकडून पाण्यासाठी सगळे सहकार्य मिळेल, असे समीर जानवलकर, भगवत सिंग चुंडावत यांनी यावेळी बोलताना स्पष्ट केले. या उपक्रमामुळे येथील नदी गाळापासून मोकळा श्‍वास घेणार आहे.