होमपेज › Konkan › वागदे स्टॉपवर बसेस न थांबविल्याने विद्यार्थ्यांचे हाल

वागदे स्टॉपवर बसेस न थांबविल्याने विद्यार्थ्यांचे हाल

Published On: Jan 31 2018 12:00AM | Last Updated: Jan 30 2018 11:16PMकणकवली : शहर वार्ताहर

वागदे गावातील  एकाही बस स्टॉपवर गुरुवारी सकाळी एस.टी.बस.थांबविण्यात न आल्याने कणकवलीत शाळा, कॉलेजमध्ये येणार्‍या विद्यार्थ्यांची गैरसोय झाली. विद्यार्थ्यांच्या परीक्षा सुरू असल्याने बस न थांबिल्याने परीक्षेच्या वेळेत विद्यार्थ्यांना पोहचता आले नाही. यामुळे संतप्त पालक व  वागदे ग्रामस्थांनी कणकवली आगार व्यवस्थापकाची भेट घेऊन जाब विचारला. यावेळी आगार व्यवस्थापक विजय शिंदे यांनी संबंधित आगारप्रमुखांना चालक व वाहकांवर चौकशी करून कारवाई करण्याच्या सूचना दिल्या. 

मालवणवरून सुटणारी मालवण-कणकवली, कुडाळ -रत्नागिरी, सावंतवाडी कणकवली या तीनही बसेस वागदे गावातील बसस्टॉपवर सकाळी नेहमी थांबा घेतात. या बसेसने अनेक विद्यार्थी शाळा, महाविद्यालय, कॉलेजमध्ये येतात. मात्र, गुरुवारी यातील एकही बस वागदे बस स्टॉपवर थांबविण्यात आली नाही. सध्या  विद्यार्थ्यांच्या परीक्षा सुरु असल्याने शाळामध्ये वेळेत पोहचणे महत्त्वाचे होते. मात्र बसने थांबा न घेतल्याने गुरुवारी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान झाले. त्यामुळे संतप्त पालकांनी व ग्रामस्थांनी महामार्गावर उतरत सावंतवाडी-रत्नागिरी ही हिरकणी  बस थांबवून तिकीट काढून विद्यार्थ्यांना शाळेत मार्गस्थ केले. काहींनी खाजगी गाड्यांमधून  विद्यार्थ्यांना  परीक्षेला पोहचविले. 

चालक-वाहकांच्या हलगर्जीपणाचा  जाब विचारण्यासाठी पालकांनी व वागदे ग्रामस्थांनी आगार व्यवस्थापकाची भेट घेत खडेबोल सुनावले. आगार व्यवस्थापक विजय शिंदे यांनी कुडाळ, सावंतवाडी, मालवण, कसाल या  आगारप्रमुखांशी दुरध्वनीवरुन चर्चा करून चालक व वाहकांवर चौकशी करून कारवाई करण्याची मागणी केली. 

तसेच गाडीत गर्दी असली तरी विद्यार्थ्यांना बसमध्ये घेण्याच्या सूचना सर्व चालक -वाहकांना देण्याचे त्यांनी आगर प्रमुखांना सांगितले. यावेळी श्री. शिंदे यांनी विद्यार्थ्यांना आपला मोबाईल नंबर  देत यापुढे बस न थांबविल्यास तेथूनच आपल्याशी संपर्क साधावा,  असे आवाहन केले. यावेळी वागदे उपसरपंच संतोष 
गावडे, ग्रा.प. सदस्य रुपेश आमडोस्कर, संदेश परब, सुहास गावडे, विशाल गावडे, आदी उपस्थित होते .