Thu, Aug 22, 2019 08:43होमपेज › Konkan › वाहतूक अधिकार्‍याला मारहाणीचा निषेध

वाहतूक अधिकार्‍याला मारहाणीचा निषेध

Published On: Jun 27 2018 1:20AM | Last Updated: Jun 26 2018 11:21PMरत्नागिरी : प्रतिनिधी 

एसटीच्या विभागीय कार्यशाळेत दि. 18 रोजी ‘मनसे’च्या पदाधिकारी व संघटनेच्या कार्यकर्त्यांनी विभाग वाहतूक अधिकार्‍याला मारहाण केली होती. या घटनेचा मंगळवार दि. 26 रोजी अधिकारी व कर्मचार्‍यांनी दिवसभर काळ्या फिती लावून निषेध व्यक्‍त करत, दोषींवर कठोर कारवाई करा, अशी मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी आणि जिल्हा पोलिस अधीक्षक यांना देण्यात आले आहे.

दि. 18 रोजी कार्यालयीन कामकाजाची वेळ संपल्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण राज्य परिवहन कामगार सेना अध्यक्ष हरी माळी हे विभागीय कार्यशाळा ‘मनसे’ अध्यक्ष उल्हास पालकर व सचिव अमोल जाधव यांच्यासह रत्नागिरीतील स्थानिक ‘मनसे’ कार्यकर्ते सुनील साळवी व इतर 15 ते 20 कार्यकर्त्यांसह कामगार शाखेत आले होते. यावेळी संपकाळात चालकाला मारहाण करणार्‍या अधिकार्‍याची चौकशी करता तेथे उपस्थित असलेले विभाग वाहतूक अधिकारी संतोष बोगरे यांना मारहाण केली. यावेळी त्यांच्या सोबत असलेले उल्हास पालकर आणि अमोल जाधव हे सुद्धा त्यांच्या अंगावर धावून गेले होते. ‘मनसे’च्या अधिकारी व कार्यकर्त्यांनी बोगरे यांना अर्वाच्च भाषेत शिविगाळही केली. या घटनेत बोगरे यांचे घड्याळ तुटले. 

या मारहाण प्रकरणाच्या निषेधार्थ माळनाका येथील विभागीय कार्यालयात मंगळवारी कर्मचार्‍यांनी काळ्या फिती लावून आंदोलन केले. कार्यालयाच्या प्रांगणात अधिकारी आणि कर्मचारी यांनी एकत्र जमत या घटनेचा निषेध व्यक्‍त केला. यावेळी विभाग नियंत्रक अनिल म्हेतर, आर. एस. भडाळे, ए. बी. जाधव, अजय मोरे, आर. ए. मराठे आदी अधिकार्‍यांसह कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी उपस्थितांनी ‘मनसे’च्या या कृत्याचा निषेध व्यक्‍त करत मराठीची अस्मिता जपणार्‍यांकडून मराठी माणसालाच मारहाण करणे चुकीचे असल्याचे सांगितले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजलक्ष्मी सुर्वे यांनी केले.

चर्चेतून मार्ग सुटला असता : अनिल म्हेतर

एसटी विभाग नियंत्रकाला मारहाण करणे ही घटना गंभीर असून याची दखल प्रशासनाने घेतली आहे. या प्रकरणांची कार्यालयीन चौकशी सुरू झाली असून दोषी असणार्‍यांवर कठोर कारवाई करण्यात येईल. हे प्रकरण चर्चेतून सुटले असते, मात्र काहीजण मारहाण करण्याच्या उद्देशानेच त्यावेळी आले होते, असे विभाग नियंत्रक अनिल म्हेतर यांनी सांगितले.