Tue, Jul 23, 2019 11:08होमपेज › Konkan › सौदीच्या राजपुत्राचे लाड कोकणात नकोत

सौदीच्या राजपुत्राचे लाड कोकणात नकोत

Published On: Apr 15 2018 1:33AM | Last Updated: Apr 14 2018 11:55PMरत्नागिरीः प्रतिनिधी

नाणार येथील प्रस्तावित पेट्रोकेमिकल रिफायनरीबाबत शिवसेना अधिकच आक्रमक झाली असून सौदी अरेबियाच्या राजपुत्राचे लाड पुरवण्यासाठी कोकणात पेट्रोकेमिकल रिफायनरी उभारण्यात येत आहे. मात्र, आम्ही हे कदापी खपवून घेणार नसून हा प्रकल्प रद्द करण्यासाठी शिवसेना आमदारांना घेऊन मुख्यमंत्र्यांच्या ‘वर्षा’ बंगल्यावर धडक देणार असल्याचा इशारा खा. विनायक राऊत यांनी दिला आहे. 

येथील शासकीय विश्रामगृहावर ते पत्रकारांशी बोलत होते. यावेळी त्यांनी सांगितले की, नाणार येथील प्रस्तावित रिफायनरी प्रकल्पाला इथल्या स्थानिक जनतेचा तीव्र विरोध आहे. मात्र, हा विरोध डावलून सरकार हा प्रकल्प कोकणच्या माथी लादण्याच्या तयारीत आहे. शिवसेनेचा सुरुवातीपासूनच या प्रकल्पाच्या विरोधात आहे. सौदी अरेबियाशी झालेल्या करारानंतर तर शिवसेना अधिकच आक्रमक झाली आहे. याप्रकरणी शिवसेनेचे सर्व आमदार मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी धडक देणार असून त्यांना स्वस्थ बसू देणार नाही. 

एवढ्यावरच न थांबता शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची परवानगी घेऊन अगदी दिल्लीपर्यंत संबंधित खात्याच्या मंत्र्यांच्या निवासस्थानापर्यंत धडक देऊ. आमदार राजन साळवी यांच्यावर दाखल केलेले गुन्हे म्हणजे सरकारची दडपशाही असून हा प्रकल्प लादण्यासाठी मुख्यमंत्री काहीही करण्यास तयार आहेत, हे यावरून दिसत आहे. 

भू-माफियांना शासनाचा वरदहस्त
रिफायनरी प्रकल्पामुळे नाणार आणि परिसरातील जमिनींना सोन्याचे भाव आले आहेत. त्यामुळे या जमिनींची खरेदी-विक्री करण्यासाठी गुजरातहून भू-माफियांची टोळधाड आलेली आहे. त्यांना शासनाचा वरदहस्त लाभत असून, त्यामुळे प्रकल्पविरोधातील वातावरण आता आणखी तापण्याची शक्यता आहे, असेही खा. राऊत यांनी सांगितले.