Thu, May 23, 2019 20:25
    ब्रेकिंग    होमपेज › Konkan › शिक्षकाच्या बदलीसाठी वरवडे ग्रामस्थांचे पं.स.मध्ये ठाण 

शिक्षकाच्या बदलीसाठी वरवडे ग्रामस्थांचे पं.स.मध्ये ठाण 

Published On: Apr 19 2018 10:43PM | Last Updated: Apr 19 2018 10:43PMकणकवली : वार्ताहर

वरवडे नं. 1 मध्ये असलेले शिक्षक प्रदीप मांजरेकर हे  आमच्या शाळेत नको आहेत, त्यांची अन्यत्र बदली करावी, या मागणीसाठी वरवडेतील लोकप्रतिनिधी व ग्रामस्थ, पालकांनी पंंचायत समिती कार्यालयामध्ये गुरुवारी ठाण मांडला. ग्रामस्थांच्या मागणीनुसार संबंधित शिक्षकाला पं.स.मध्ये कामगिरीवर घेण्याचा निर्णय सभापती, गटविकास अधिकारी यांनी दिला. या कारवाईप्रकरणी सायंकाळी शिक्षक समितीकडून सभापती, गटविकास अधिकारी यांची भेट घेत शिक्षक मांजरेकर हे शुक्रवारपासून रजेवर जातील, तोपर्यंत अधिकार्‍यांमार्फत योग्य ती चौकशी करण्यात यावी. पुढील शैक्षणिक वर्षात बदल्या न झाल्यास मांजरेकर यांना कामगिरीवर पाठविण्यात यावे, अशी भूमिका  शिक्षक समितीने मांडली. याप्रकरणावरून पं.स.मध्ये दिवसभर घडामोडी सुरू होत्या.

वरवडे नं. 1 शाळेला महिंद्रा कंपनी व रोटरी क्लब कणकवली यांच्याकडून  संगणक देण्यात आला होता.  हा संगणक मुख्याध्यापिकेने  काही कारणास्तव घरी नेला होता. सुट्टीत घरी नेलेला संगणक सोमवारी शाळेत आणला. या कालावधीत रोटरी क्‍लबच्या एका सदस्याला संगणकाविषयी निनावी पत्र मिळाले. त्यावरून  रोटरी क्‍लबच्या संबंधित सदस्याने गटविकास अधिकार्‍यांना पत्र देत याची माहिती दिली. याप्रकरणी शाळा व्यवस्थापन समितीने बुधवारी शाळेत बैठक आयोजित केली होती. बैठकीला उपस्थितीत पं.स.सदस्या सौ.राधिका सावंत व ग्रामस्थांनी या निनावी पत्राविषयी शिक्षक प्रदीप मांजरेकर यांच्याकडे चौकशी केली.  त्यानंतर याप्रकरणी गुरुवारी सकाळी सभापती सौ.भाग्यलक्ष्मी साटम, गटविकास अधिकारी मनोज भोसले यांची जि.प.सदस्या सौ.स्वरूपा विखाळे, पं.स.सदस्या सौ.राधिका सावंत, स्वाभिमानचे तालुका उपाध्यक्ष सोनू सावंत, ग्रा़ पं़ सदस्य प्रदीप घाडीगांवकर, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष मंगेश घाडीगांवकर, तंटामुक्त अध्यक्ष संतोष कदम, सादीक कुडाळकर, प्रकाश परब, प्रभाकर अपराज, रामदास बांवकर, विजय कदम, दशरथ घाडीगांवकर, सचिन घाडीगांवकर, हनुमंत बोंद्रे, सुनील सावंत यांनी  भेट घेतली.

वरवडेतील लोकप्रतिनिधी व ग्रामस्थांनी शाळेतील याप्रकाराची माहिती सभापती, गटविकास अधिकारी यांना देत  शिक्षक मांजरेकर  यांची बदली करावी, अशी भूमिका मांडली. याविषयी समोरासमोर चर्चा करण्यासाठी शिक्षक मांजरेकर यांना पं.स.मध्ये उपस्थित राहण्याचा निरोप शिक्षण विस्तार अधिकार्‍यांमार्फत घेण्यात आला. मात्र शिक्षक मांजरेकर हे पंचायत समितीमध्ये वेळेत उपस्थित राहिले नाहीत. ग्रामस्थ आपल्या मागणीवर ठाम राहिल्याने शिक्षक मांजरेकर यांना कामगिरीवर पं.स.मध्ये घेण्याचा निर्णय सभापती, गटविकास अधिकारी यांनी घेतला. 

याप्रकरणी सायंकाळी प्राथमिक शिक्षक समितीचे तालुकाध्यक्ष गिलबर्ट फर्नांडिस यांच्या नेतृत्वाखाली प्रदीप मांजरेकर व शिक्षकांनी सभापती व गटविकास अधिकारी यांची भेट घेतली. यावेळी मांजरेकर यांनी आपला कोणत्याही निनावी पत्राशी संबंध नाही. आपल्यावर ग्रामस्थांचा रोष नाही, त्यामुळे त्या शाळेत मी माझ्या जबाबदारीवर जाण्यास तयार आहे, अशी भूमिका मांडली. कामगिरीच्या निर्णयावर सभापती ठाम राहिले. यावेळी गिलबर्ट फर्नांडिस यांनी मांजरेकर हे 20 एप्रिलपासून 11 दिवस रजेवर जातील. या कालावधीत शिक्षण विभागामार्फत चौकशी करण्यात यावी. उन्हाळी सुट्टीसंपल्यानंतर मांजरेकर हे त्या शाळेत हजर होतील त्यादरम्यान होणार्‍या शिक्षक बदल्यांमध्ये मांजरेकर यांचा समावेश नसल्यास त्यांना कामगिरीवर अन्य शाळेत पाठविण्यात यावे, अशी भूमिका मांडली.