होमपेज › Konkan › कणकवलीचा गावठी बाजार गजबजला 

कणकवलीचा गावठी बाजार गजबजला 

Published On: Jan 28 2018 11:59PM | Last Updated: Jan 28 2018 11:00PMकणकवली : वार्ताहर

कोकम, कुळीथपीठ, नारळ, उकडे तांदूळ, पालेभाजी, फळभाजी, झुणका-भाकर, वडेसागोती यासह गावागावातून शेतकर्‍यांनी आणलेल्या गावठी वस्तुंच्या खरेदीसाठी ग्राहकांनी गर्दी केली होती. ग्राहकांच्या उदंड प्रतिसादामुळे जि.प. बांधकाम उपविभागाचा परिसर गजबजून गेला. शेतकर्‍यांनी आणलेल्या मालाची काही तासातच विक्री झाली. पहिला प्रयोग यशस्वी झाल्याने यापुढे दर शुक्रवारी गावठी आठवडा बाजार भरविण्यात येणार आहे.

कणकवली पंचायत समिती व स्नेह सिंधु कृषि पदवीधर संघाच्यावतीने जि.प.बांधकाम उपविभागाच्या परिसरात शुक्रवारी गावठी आठवडा बाजार भरविण्यात आला होता. बाजाराचा शुभारंभ सिंधुदुर्ग बँकेचे अध्यक्ष सतीश सावंत यांच्या हस्ते करण्यात आला. जि.प. महिला बालविकास सभापती सौ. सायली सावंत, कणकवली पं.स.सभापती सौ. भाग्यलक्ष्मी साटम, उपसभापती दिलीप तळेकर,  ग्रामीण विकास यंत्रणा प्रकल्प संचालक विजय चव्हाण, कणकवलीच्या नगराध्यक्षा सौ. माधुरी गायकवाड, उपनगराध्यक्ष कन्हैया पारकर, गटविकास अधिकारी मनोज भोसले, जि.प. सदस्या सौ. श्रीया यावंत, सौ. स्वरूपा विखाळे,  माजी उपनगराध्यक्ष समीर नलावडे, ज्येष्ठ पत्रकार अशोक करंबेळकर, स्नेह सिंधु कृषि पदवीधर संघाचे हेमंत सावंत, पंकज दळी, संदीप राणे, डी. आर. परब, किशोर राणे, जानवली माजी सरपंच सौ. स्वाती राणे आदी उपस्थित होते. 

सतीश सावंत म्हणाले, गावठी बाजारच्या माध्यमातून गावठी वस्तू ग्राहकांना खरेदी करण्याचे समाधान मिळत आहे. तर ग्रामीण भागातील शेतकर्‍यांना सेंद्रीय खतावर आधारीत शेतमाल विक्रीसाठी जागा उपलब्ध झाल्यामुळे त्यांच्यामध्येही समाधान आहे. हा उपक्रम निश्‍चितच कौतुकास्पद असून शेतकर्‍यांच्या बळकटीकरणासाठी असलेल्या अशा उपक्रमांना सिंधुदुर्ग बँकेकडून नेहमीच सहकार्य राहणार आहे. यापुढे जिल्ह्यातील प्रत्येक पंचायत समितीमध्ये असा गावठी आठवडा बाजार भरविला जाणार आहे असे सांगितले. 

कणकवली तालुक्याच्या कृषि विकासाला गती मिळावी यासाठी गावठी आठवडा बाजार निश्‍चितच महत्त्वाचा ठरणार आहे. शेतकर्‍यांना आवश्यक असलेल्या  सोयीसुविधा पुरवून त्यांना पाठबळ देण्याचा प्रयत्न तसेच कृषि विषयक योजना अधिक सक्षमपणे राबविण्यावर भर दिला जाणार आहे, असे सभापती सौ. साटम यांनी सांगितले. शेतकर्‍यांना आपल्याकडील उत्पादित शेतमालाला योग्य बाजारभाव मिळावा यासाठी गावठी आठवडा बाजार ही संकल्पना राबविण्यात येत आहे. तालुक्यातील शेतकर्‍यांना आर्थिक उभारी मिळावी त्याचबरोबर युवा वर्गाने या क्षेत्रात यावे यासाठीचे प्रयत्न होत आहेत.  गावठी आठवडा बाजाराला मिळालेला प्रतिसाद पाहता येत्या काळात संपूर्ण जिल्ह्यामध्ये हा प्रयोग यशस्वी होईल, असा विश्‍वास स्नेह सिंधुचे हेमंत सावंत, पंकज दळी, संदीप राणे यांनी व्यक्‍त केला. दुपारपर्यंत आठवडा बाजारात गावठी वस्तूंच्या खरेदीसाठी मोठी गर्दी झाली होती. थेट शेतकर्‍यांकडील माल खरेदी करण्याची संधी मिळत असल्याने ताजी व सेंद्रीय भाजी व इतर वस्तू खरेदी करण्याचा आनंद अनेकांनी घेतला.