Wed, Jul 17, 2019 20:23होमपेज › Konkan › जल्लोष...थरार अन् जागर!

जल्लोष...थरार अन् जागर!

Published On: Feb 10 2018 11:17PM | Last Updated: Feb 10 2018 10:54PMरत्नागिरी : योगेश हळदवणेकर

क्रिकेटचा जल्लोष...कबड्डीचा थरार आणि शिवशंभोचा जागर अशा अपूर्व उत्साहात तालुक्यातील गावखडी गावच्या श्री देव रामेश्‍वराचा महाशिवरात्रोत्सव रंगतदार बनला आहे. कबड्डीचे माहेरघर म्हणून ओळखले जाणारे जिल्ह्यातील गावखडी हे गाव कबड्डी खेळाची नवी पिढी घडवत आहे. 

विशाल अरबी समुद्राची गाज, सुरू बनाचा साज आणि एक विलक्षण ऐटीचा गावकर्‍यांचा बाज असणारे गावखडी गाव कला, क्रीडा, साहित्य सांस्कृतिक आणि शैक्षणिकद‍ृष्ट्याही विकसीत आहे. गावाने साहित्यिक दिले, नटवर्य दिले, खेळाडू दिले आणि चांगली प्रामाणिक माणसंही. गावच्या  भौगोलिक परिस्थितीचा अभ्यास केल्यास गावाच्या सभोवार अरबी समुद्र, मुचकुंदी नदी आणि पूर्णगडची खाडी असा त्रिवेणी संगम पहावयास मिळतो. गावात देवीची तीन मंदिरे आणि देवांची तीन मंदिरे आहेेत. त्याशिवाय स्वामी समर्थांचा मठही आहे. गावात तसे भक्‍तीमय वातावरण कायम असते. गावच्या या भक्‍तीमय वातावरणात नवरात्र, शिवरात्र या दोन उत्सवावेळी विविध उपक्रम राबविण्यात येतात. नवरात्र उत्सव हा जाकादेवी-जुगादेवी-मानुबाई या मंदिरात तर शिवरात्र उत्सव रामेश्‍वर मंदिरात साजरा होतो. एकोपा आणि सर्वधर्मसमभावाचे प्रतीक असणारे हे उत्सव म्हणजे गावच्या एकीला बळ देणारे ठरत आहेत.  याच उत्सवांपैकी रामेश्‍वर उत्सवावेळी भजन, कीर्तन, पारायण, नाटक, नामजप आणि खेळ यांचा अनोखा मिलाफ पहायला मिळतो. 

मातीतील खेळांना प्रोत्साहन देणे, गावातच खेळाडू तयार करणे आणि नुसतेच खेळाडू तयार करणे नव्हे तर कबड्डी असो वा क्रिकेट खेळाच्या मैदानात कोणत्याही दिग्गज संघाविरोधात खेळण्याची ताकद निर्माण करणे, हाच उद्देश ठेवून तालुक्यातील गावखडी गावच्या श्री देव रामेश्‍वर उत्सव मंडळाने गेली कित्येक वर्षे दशक्रोशीतील लाल मातीच्या कबड्डी आणि क्रिकेट या खेळांचे आयोजन करीत आहे. यावर्षी तब्बल 95 सामने पाच दिवसांच्या महाशिवरात्र उत्सव काळामध्ये होणार आहेत.

दशक्रोशीतील मित्रत्व, दोस्ती, दर्यासागर, रिंगीण, चक्की ग्रुप, विठ्ठल रखुमाई, एमएसएम, मोमिन, आगवेकरवाडी, भालावली कॉलेज, सिद्धिविनायक, तेजोमय, न्यू दर्यासागर, कुंभारवाडी, समर्थकृपा, ओल्ड सिद्धिविनायक, शिवतीर्थ, जय भंडारी, ओल्ड इज गोल्ड, महापुरूष पोलिस, माऊली कशेळी, समताशील, रणझुंजार, कमलसुत, कालिका मिरजोळे, ओमसाई मिरजोळे, जाकादेवी, महापुरूष कशेळी, वि.सी. गुर्जर कशेळी, सिद्धेश्‍वर पूर्णगड, शिवतेज, शरर्विन इलेव्हन, एमएस गावखडी, शिवसंकल्प, साईरत्न असे सुमारे 35 संघ या कबड्डी आणि क्रिकेट या स्पर्धांमध्ये सहभागी झाले आहेत.  यातील बहुसंख्य संघ हे गावच्या मैदानाच तयार झालेले आहेत, हे वैशिष्ट्य! ही स्पर्धा दि. 14 रोजी संपणार आहे. मात्र, यातून भावी खेळाडू तयार होण्यास मदत होणार, हे मात्र नक्की!