Sat, Mar 23, 2019 02:34होमपेज › Konkan › कोकणातील ग्रामविकासाला येणार गती

कोकणातील ग्रामविकासाला येणार गती

Published On: Feb 24 2018 1:14AM | Last Updated: Feb 23 2018 8:54PMरत्नागिरी : प्रतिनिधी

कोकणातील गावांचा विकास करण्यासाठी या गावांना प्रगतीच्या कक्षेत आणण्यासाठी शासनाने व्हीएसटीएम (व्हीलेज सोशल ट्रान्सफॉर्मेशन मिशन ः सामाजिक ग्रामपरिवर्तन अभियान) पाचही जिल्ह्यांत राबवण्यात येणार आहे. अभियानात कोकणातील पाच जिल्ह्यांतील 131 ग्रामपंचायतींची निवड करण्यात आली आहे. योजनेंतर्गत ग्रामविकास आराखडा तयार करण्यासाठी ग्राम परिवर्तक निदेशकांची नियुक्‍ती करण्यात आली आहे. 

राज्यात राबवण्यात येणार्‍या ग्राम सामाजिक परिवर्तन अभियानांतर्गत राज्य, विभाग, जिल्हा, तालुका  आणि ग्रामस्तरावर स्थापन करण्यात येणार्‍या समित्यांवर शासकीय अधिकार्‍यांना नियुक्‍त करण्यात येणार आहे. या संपूर्ण अभियानाच्या अंमलबजावणीसाठी ग्रामविकास विभाग नोडल एजन्सी म्हणून काम पाहणार आहे.  तसेच या अभियानांतर्गत प्राप्त होणार्‍या निधीसाठी गावस्तरावर स्वतंत्र खाते उघडण्यात येणार आहे.

राज्यातील खासगी आणि सार्वजनिक संस्था, उद्योगसमूह तसेच वित्तीय संस्था यांच्या सामाजिक दायित्त्व उपक्रमाच्या (सीएसआर) माध्यमातून ग्रामीण भागातील एक हजार गावांमध्ये परिवर्तन घडवून आणण्यासह ही गावे शाश्‍वत विकासासाठी सक्षम करण्याचा महत्त्वाकांक्षी उपक्रम राबवण्यात येत आहे.  यासाठी ग्रामपरिवर्तकांची निवड करण्यात आली आहे. हे परिवर्तक निवडलेल्या गावांमध्ये अभियानाचे काम पाहणार आहेत. ग्राम सामाजिक परिवर्तन अभियानांतर्गत ग्रामविकास विभाग नोडल एजन्सी म्हणून काम करणार आहे. या अभियानात कोकणातील पाचही जिल्ह्यांतील 131 गावांची निवड करण्यात आली आहे. 

मुख्यमंत्री सहाय्यता निधीमधून विशेष दुष्काळ निवारणासाठी देणगीदारांकडून प्राप्त झालेल्या निधीमधून या अभियानासाठी निधी देण्यात येणार आहे. सर्व राज्य पुरस्कृत योजनांसंदर्भात अभियानांतर्गत निवडलेल्या गावांमध्ये निश्‍चित केलेले उद्दिष्ट प्राप्त करून घेण्यासाठी व विशेषत: परिवर्तन निर्देशक व योजनांचे  उद्दिष्ट प्राप्त करण्यासाठी संबंधित विभागांनी प्राधान्याने आवश्यक कार्यवाही करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. याशिवाय आदिवासी विकास विभाग, ग्राम विकास विभाग, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, कौशल्य विकास व उद्योजकता विभाग, जलसंधारण विभाग, शालेय शिक्षण विभाग तसेच अभियानास आवश्यकता भासल्यास इतर विभागांकडून सहाय्य घेण्यात येणार आहे. मूल्यमापन करण्यासाठी तज्ज्ञ संस्थेची निवड करण्यात येणार आहे. खर्च करण्यासाठी वितरित करण्यात येणारा निधी फाऊंडेशनमार्फत गावपातळीवर उपलब्ध करुन देण्यासाठी गावस्तरावर स्वतंत्र खाते उघडण्यास व याकरिता संबंधित गावांचे सरपंच व ग्रामसेवक यांना प्राधिकृत करण्यात येणार आहे.