Thu, Apr 25, 2019 23:28होमपेज › Konkan › वेंगुर्लेतील अतिवृष्टीत हानी झालेल्या गावांना पालकमंत्र्यांची भेट

वेंगुर्लेतील अतिवृष्टीत हानी झालेल्या गावांना पालकमंत्र्यांची भेट

Published On: Jun 23 2018 10:44PM | Last Updated: Jun 23 2018 8:46PMवेंगुर्ले ः प्रतिनिधी 

वेंगुर्ले तालुक्यातील अतिवृष्टीमुळे हानी झालेल्या, निवती, कोचरा, म्हापण, खवणे या गावांना पालकमंत्री दीपक केसरकर यांनी भेटी देऊन बाधित कुटुंबीयांना नैसर्गिक आपत्तीतून  तातडीने मदत मिळवून देण्याचे आश्‍वासन दिले. 

वेंगुर्ले तालुक्यात बुधवारी झालेल्या अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणावर गावांना त्याची झळ बसली. तालुक्यातील किनारपट्टी खाडीलगत असलेल्या गावांना जास्त फटका या अतिवृष्टीमुळे बसला असून म्हापण, खवणे, कोचरे ही गावे अतिवृष्टीमुळे पाण्याखाली गेली होती. स्थानिक ग्रामस्थ व तहसीलदार यांनी तातडीने मदतकार्य सुरू केल्यामुळे मोठी हानी टळली. 

गुरुवारी सायंकाळी पालकमंत्री दीपक केसरकर यांनी कोचरा, म्हापण भागाला भेट दिली. यावेळी जिल्हा परिषद सदस्य नितीन शिरोडकर, सभापती यशवंत परब, शिवसेना तालुकाप्रमुख बाळा दळवी, पंकज शिरसाट, म्हापण उपसरपंच प्रदीप पाटकर, कोचरा सरपंच साक्षी फणसेकर,  योगेश तेली, विश्‍वनाथ म्हापणकर आदी पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी पालकमंत्री दीपक केसरकर यांनी नुकसानग्रस्तांच्या पाठीशी शिवसेना पक्ष कायम राहिला असून जी कुटुंबे यामुळे बाधित झाली आहेत त्यांना मदत केली जाईल.
 प्रशासनाकडून आर्थिक मदत नैसर्गिक आपत्तीमधून दिली जात असून लवकरच ही भरपाई मिळेल असे आश्‍वासन दिले. 

पालकमंत्री केसरकर यांनी कोचरा खवणेतील घरांना भेट देऊन पाहणी केली. नुकसानग्रस्त भागाचे तातडीने पंचनामे करून आर्थिक मदत देण्याचे आदेश तहसीलदार शरद गोसावी यांना दिले.