Mon, Jun 24, 2019 21:29होमपेज › Konkan › जामीन झाल्यानंतर वालम, चव्हाण यांना पुन्हा अटक

जामीन झाल्यानंतर वालम, चव्हाण यांना पुन्हा अटक

Published On: Jan 16 2018 2:11AM | Last Updated: Jan 15 2018 9:12PM

बुकमार्क करा
राजापूर : प्रतिनिधी

रविवारी कुंभवडे येथे रिफायनरी प्रकल्पावरुन  झालेली  हाणामारी व त्यानंतर  नाटे पोलिस ठाण्यात मनाई आदेश असताना जमावाने  केलेला प्रवेश  अशा दोन प्रकारच्या  गुन्ह्यांत  उभय बाजूच्या अठ्ठावीस जणांवर पोलिसांकडून  गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यापैकी दहा जणांना अटक करुन सोमवारी राजापूर न्यायालयापुढे हजर केले असता, प्रत्येकी पंधरा हजारांचा जामीन व आठवड्यातील एक दिवस अनुक्रमे नाटे व राजापूर पोलिसांत हजेरी लावण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. दरम्यान, पंढरीनाथ आंबेरकर यांना झालेल्या मारहाण प्रकरणी पोलीसांनी अशोक वालम व मंगेश चव्हाण यांना अन्य गुन्ह्यात पुन्हा अटक केली आहे.

रविवारी कुंभवडे येथे रिफायनरी प्रकल्पावरुन हाणामारी झाली होती. त्यामध्ये कुंभवडेचे पंढरीनाथ आंबेरकर यांना मारहाण  करण्यात आली होती. त्यानंतर पंढरीनाथ आंबेरकर यांनी राजापूर ठाण्यात झालेल्या मारहाणीविरुद्ध अशोक वालम यांच्या पत्नीसह अन्य जणांविरुद्ध तक्रार दाखल केली होती. या हाणामारीनंतर  रिफायनरी परिसराला मनाई आदेश असताना देखील सुमारे आठशे जणांचा जमाव नाटे पोलिस ठाण्यात गेला होता. 

त्यामुळे नाटे पोलिसांनी अशोक वालम यांच्यासह तेवीस जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. त्यातील अशोक वालम, विलास नार्वेकर, सचिन कोरगावकर, मंगेश चव्हाण व नितीन जठार यांना अटक करण्यात आली होती. त्या सर्वांना न्यायालयापुढे हजर करण्यात आले असता, प्रत्येकी पंधरा हजारांच्या जामिनावर सुटका करण्यात आली. त्याचवेळी दर रविवारी नाटे पोलिस ठाण्यात हजेरी लावण्याचे आदेश दिले.

कुंभवडे येथे बैठकीत झालेल्या हाणामारीत अशोक वालम यांची पत्नी अश्‍विनी वालम यांनी बैठकीत आलेल्या पंढरीनाथ आंबेरकर, मेघनाथ विश्‍वनाथ आंबेरकर, ज्ञानदिप आंबेरकर, अरुण बापू आंबेरकर व संदीप नारायण पांचाळ यांच्या विरुद्ध तक्रार नोंदविली होती. त्यांपैकी पंढरीनाथ आंबेरकर हे जखमी असून ते रत्नागिरीतील चिरायु हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असल्याने त्यांना अटक झाली नव्हती. उर्वरित चौघांना अटक करण्यात आली होती.

त्यांना सोमवारी न्यायालयात हजर करण्यत आले असता, प्रत्येकी साडेसात हजारांच्या जामीनावर त्यांची मुक्‍तता करण्यात आली. दिनांक 15 मार्चपर्यंत दर गुरुवारी राजापूर पोलिस ठाण्यात हजेरी लावण्याचे आदेश न्यायालयाने दिले. या हाणामारीत पंढरीनाथ आंबेरकर हे जखमी झाल्याने त्यांच्या तक्रारीवरुन पोलिसांनी अश्‍विनी अशोक वालम यांच्यावर गुन्हा दाखल केला होता त्यानाही न्यायालयात हजर केले असता पंधरा हजारांचा जामीनावर सुटका करण्यात आली. दर शनिवारी राजापूर पोलिस ठाण्यात हजेरी लावण्याचे आदेश देण्यात आले. नंतर याच प्रकरणात जामीनावर मुक्‍तता झालेले अशोक वालम व मंगेश चव्हाण यांना नाटे  पोलिसांनी न्यायालयाच्या बाहेर पुन्हा अटक केली. एकूण तीन गुन्ह्यांत  पोलिसांनी दहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. नाटे पोलिस ठाण्यात बेकायदा जमावबंदी करणार्‍या अन्य अठरा जणांना अद्याप अटक व्हायची असून या प्रकरणाने तालुक्यात खळबळ उडाली आहे.