Thu, Jun 27, 2019 01:35होमपेज › Konkan › घोंगडी, इरले कालौघात विरले

घोंगडी, इरले कालौघात विरले

Published On: Jun 27 2018 1:20AM | Last Updated: Jun 26 2018 10:39PMदेवरूख : नीलेश जाधव

पावसाळ्यात लावणीची कामे करताना पावसापासून स्वत:चा बचाव करण्यासाठी एके काळी शेतकरी सर्रासपणे इरले व घोंगडीचा  सर्रास वापर करत असत. परंतु, आता जमाना बदलला असून सध्याच्या आधुनिक युगामध्ये रेडीमेड वस्तू बाजारात आल्याने या वस्तू वापरण्याकडे शेतकर्‍यांचा जास्त कल असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे इरले व घोंगडीचा वापर आपोआप कमी झाला आहे. परिणामी अलिकडच्या काही वर्षांत इरले व घोंगडी कालबाह्य झाली आहे.

पूर्वीच्या काळी आधुनिकीकरण नसल्यामुळे भात लावणीची कामे करताना पावसापासून शरीराचा बचाव आणि शरीराला ऊब मिळवण्यासाठी इरले व घोंगडी मोठ्या प्रमाणात वापरली जात असे. लावणीच्या कामासाठी वापरण्यात येणार्‍या अनेक साहित्यांपैकी इरले व घोंगडीला एकेकाळी मोठे महत्त्व होते. शेतकरी इरले स्वत: तयार करीत असत. या इरल्याची बांधणीही वेगळ्या धाटणीची असायची. पूर्ण शरीर झाकले जाईल अशा पद्धतीने हे इरले तयार केले जायचे. त्यामुळे लावणीचे काम करताना आपोआप शरीराचा बचाव होत होता. पूर्वीच्या काळी शेतकरी इरले वापरण्यावर जास्त भर द्यायचे. शेतीचे काम करून झाल्यावर भाकर खाताना शेतकरी हे इरले शेतात उभे करून ठेवत असत. तेव्हा लांबून बघणार्‍याला या इरल्याखाली शेतकरी बसला आहे की काय असे वाटायचे, अशी या इरल्याची एक वेगळी खासियत होती. 

दुसरीकडे घोंगडीचा वापर केल्याने पावसापासून तर बचाव होत होता. परंतु, थंडीपासूनही अतिशय चांगली अशी ऊब मिळत असे. शेतीचे काम आटोपल्यानंतर सायंकाळी घरी आल्यावर शेतकरी ही घोंगडी पिरश्यावरील दांडीवर सुकण्यासाठी ठेवत असत. त्याचाही आनंद शेतकर्‍यांसाठी औरच असायचा. अशी या घोंगडीचीदेखील त्याकाळी एक वेगळी ओळख होती.इरले व घोंगडी अनेक वर्षे टिकत होती. त्यामुळे इरले व घोंगडीलाच शेतकर्‍यांची जास्त पसंती असायची. साधारणपणे महिला इरले डोक्यावर घेऊन लावणीची कामे करत असत. तर पुरूष घोंगडी डोक्यावर घेऊन जोत हाकण्याचे काम करीत असत. अशी पूर्वीच्या काळी पद्धत होती. इरले किंवा घोंगडी डोक्यावर घेऊनच पावसापासून बचाव करत पूर्वीच्या काळी लावणीची कामे केली जात होती.

त्यामुळे जवळपास सगळ्याच शेतकर्‍यांकडे इरले व घोंगडी असल्याचे पहावयास मिळत असे. परंतु, आता जमाना बदलला असून सध्याच्या आधुनिक युगात बरीच प्रगती झाली आहे. परिणामी वस्तूंच्या वापरातसुद्धा काळानुरूप बदल होत गेला आहे. मेहनत करून वस्तू तयार करण्यापेक्षा विविध रेडीमेड वस्तू बाजारात मिळत असल्याने जुन्या वस्तू आपोआप कालबाह्य झाल्या आहेत. रेडीमेड वस्तूंनी मनुष्याच्या मनावर भुरळ घातल्याने इरले व घोंगडी नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. त्यामुळे इरले व घोंगडीचे अस्तित्व धोक्यात आले आहे. जमाना बदलल्याने इरले व घोंगडी दिसणेही दुरापास्त झाले आहे.

सद्य:स्थितीत शेतीची कामे करताना आधुनिक युगातील शेतकरी रेनकोट, प्लास्टिक कागद, टोप्या, गमबूट आदी रेडीमेड वस्तूंचा वापर करण्यावर अधिक भर देत आहे. त्यामुळे काळाच्या ओघात इरले व घोंगडी आपोआपच बाजूला फेकली गेली आहेत. आधुनिक युगात वावरत असल्यामुळेच कदाचित शेतकर्‍यांनी इरले व घोंगडी वापरण्याकडे जणू पाठ फिरवली आहे. परिणामी इरले आणि घोंगडी बनवण्याच्या व्यवसायावर गदा आली आहे.

सध्याच्या आधुनिक युगात शेतकरी लावणीची कामे करताना जरी रेनकोट व प्लास्टिक कागदाचा वापर करून पावसापासून बचाव करत असले तरी पूर्वीच्या काळी वापरण्यात येणार्‍या इरले व घोंगडीप्रमाणे थंडीपासून ते नक्‍कीच बचाव करू शकत नाहीत. तसेच इरले व घोंगडी अनेक वर्षे टिकत असल्यामुळे पूर्वीच्या काळी इरले व घोंगडीला लावणीच्या कामासाठी अनन्यसाधारण असे महत्त्व होते. म्हणजेच इरले व घोंगडी टिकावू असल्याने शेतकरी इरले व घोंगडी अनेक वर्षे वापरत असत. आजही वयोवृद्ध शेतकर्‍यांसमोर इरले व घोंगडीचे जरी नाव काढले तरी त्यांना पूर्वीच्या काळच्या शेतीचे दिवस आठवतात.