Sat, Mar 28, 2020 17:04होमपेज › Konkan › 'सामना'तील नाणार जाहिरातीबाबत मुख्यमंत्र्यांचा खुलासा, म्हणाले...

'सामना'तील नाणार जाहिरातीबाबत मुख्यमंत्र्यांचा खुलासा, म्हणाले...

Last Updated: Feb 19 2020 1:17AM
सिंधुदुर्ग : पुढारी ऑनलाईन 

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे दोन दिवसाच्या कोकण दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यावर असताना आज (दि.18) सिंधुदुर्गमध्ये पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत त्यांनी 'सामना'मध्ये आलेल्या नाणार रिफायनरी प्रकल्पाच्या जाहिरातीवर खुलासा केला. मुख्यमंत्री म्हणाले की, कोणताही जाहिरातदार शिवसेनेची भूमिका ठरवत नाही. शिवसेनेची भूमिका मी ठरवतो. नाणार होणार नाही या भूमिकेवर शिवसेना ठाम असल्याचेही त्यांनी सांगितले. 

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कोकण दौऱ्यापूर्वी शिवसेनेचे मुखपत्र सामनामध्ये नाणार रिफायनरीची जाहिरात छापून आली होती. त्यामुळे शिवसेनेने नाणार प्रकल्पाला विरोध ही आपली भूमिका बदलली आहे का असे प्रश्न विचारण्यात येऊ लागले होते. आपल्या कोकण दौऱ्याच्या पहिल्या दिवशी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी याबाबत मौन बाळगले होते. पण, आज सिंधूदूर्ग येथे पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी शिवसेनेने नाणार प्रकल्पाबाबत आपली भूमिका बदलली नाही असे स्पष्ट केले. ते म्हणाले 'शिवसेनेची भुमिका कोणताही जाहिरातदार ठरवत नाही. शिवसेनेची भूमिका मी ठरवतो. जाहिरात आली म्हणजे शिवसेनेची भूमिका बदलली असे होत नाही.'

या पत्रकार परिषदेत त्यांनी एल्गार परिषदेचा तपास एनआयएला देण्याबाबतही खुलासा केला. ते म्हणाले 'एल्गार परिषद आणि भीमा कोरेगाव प्रकरण ही दोन वेगवेगळी प्रकरणे आहेत. केंद्राने एल्गार परिषदेचा तपास काढून घेतला आहे. भीमा कोरेगावचा तपास राज्य सरकार करत आहे. या प्रकरणात दलित बांधवांवर अत्याचार झाल्याचा आरोप होत आहे. मी आश्वासन देतो की मी दलित बांधवांवर अत्याचार होऊ देणार नाही.'

मुख्यमंत्र्यांनी एनपीआर, एनआरसी आणि सीएए याबाबत प्रश्न विचारला असता त्यांनी, सीएए, एनसीआर आणि एनपीआर हे वेगवेगळे विषय आहेत. एनपीआर हा जनगणणेचा विषय आहे. असे असले तरी त्याची प्रश्वावली मी स्वतः तपासून पाहणार आहे. त्यामुळे एनपीआरबाबत काळजी करण्याचे कारण नाही असे सांगितले.