Tue, Aug 20, 2019 04:11



होमपेज › Konkan › भोस्ते घाटात दोन ट्रकची धडक

भोस्ते घाटात दोन ट्रकची धडक

Published On: Apr 17 2018 10:41PM | Last Updated: Apr 17 2018 10:18PM



खेड : प्रतिनिधी

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर भोस्ते घाटामध्ये मंगळवारी (दि.17)  सायंकाळी 4.30 वाजण्याच्या सुमारास बाजू काढण्याच्या प्रयत्नात दोन ट्रकची समोरासमोर धडक झाली. या अपघातात दोन्ही ट्रकचे चालक वाहनांमध्ये अडकल्यानेे जखमी झाले. त्यामुळे महामार्गावरील वाहतूक सुमारे तासभर ठप्प झाली होती. 

घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईहून गोव्याच्या दिशेने जाणारा घाटगे-पाटील ट्रान्सपोर्ट कंपनीचा ट्रक (एमएच09/सीए1217) व गोव्याहून मुंबईच्या दिशेने जाणारा पाटील ब्रदर्सचा ट्रक (एमएच 50/1546) यांची भोस्ते घाटातील एका वळणावर समोरील वाहनांची बाजू काढण्याच्या प्रयत्नात धडक झाली. 

अपघाताची माहिती मिळताच खेडमधील ‘मदत ग्रुप’चे प्रसाद गांधी, अ‍ॅड.अश्‍विन भोसले, खेडचे पोलिस निरीक्षक अनिल गंभीर, हवालदार संजय मारळकर व सहकारी कर्मचारी यांनी घटनास्थळी पोहोचून ट्रकमध्ये अडकून पडलेल्या चालकांची सुटका केली. 

या अपघातामुळे वाहतूक पूर्णतः ठप्प झाली होती. सुमारे एक तासांच्या प्रयत्नानंतर दोन्ही ट्रकच्या चालकांना बाहेर काढून क्रेनच्या सहाय्याने ट्रक रस्त्यावरून बाजूला करण्यात आले. त्यानंतर सुमारे 5.30 वाजण्याच्या सुमारास महामार्गावरील वाहतूक सुरू झाली. अपघातातील दोन्ही जखमी चालकांना उपचारासाठी कळंबणी उपजिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला असून सायंकाळी उशीरापर्यंत याप्रकरणी पुढील कारवाईची प्रक्रिया सुरू होती.