Sun, Jul 12, 2020 22:38होमपेज › Konkan › कुणी घर देता घर...!

कुणी घर देता घर...!

Published On: May 03 2018 11:22PM | Last Updated: May 03 2018 11:07PMजैतापूर : वार्ताहर

कुणी घर देता का घर... अशी आर्त मागणी करीत राजापूर तालुक्यातील धाऊलवल्ली ग्रामपंचायतीसमोर महाराष्ट्र दिनी दोन ज्येष्ठ नागरिक आणि एक दिव्यांग प्रौढ उपोषणाला बसले. यातून त्यांनी शासनाचे लक्ष वेधले.

धाऊलवल्ली ग्रामपंचायतीने आपल्या वडिलोपार्जित घराचा कोणताही वारस तपास न करता आपल्याला बेदखल करीत अन्य व्यक्‍तींची नावे दाखल केलेली आहेत. आपल्या वडिलोपार्जित घरात आपली नावे दाखल करण्याची वारंवार मागणी करून तसेच योग्य ते पुरावे देऊनही ग्रामपंचायत दखल घेत नसल्याने  किरण राणे व धनंजय राणे तसेच दत्ताराम धामापूरकर, दिव्यांग राजेश धामापूरकर यांनी उपोषण केले. प्रशासनाकडे वारंवार तक्रार आणि विनंती करूनही आपणाला आपल्या वडिलोपार्जित घरात प्रवेश मिळत नसल्याने उपोषणाचा मार्ग पत्करावा लागला असल्याचे उपोषणकर्त्यांनी सांगितले.

राजापूरचे गटविकास अधिकारी शिवाजी माने यांना या दोन्ही उपोषणाबाबत दुरध्वनीवरून विचारणा करण्यात आली. या प्रश्‍नावर तोडगा काढण्यासाठी राजापूर तहसीलदार, गटविकास अधिकारी, पंचायत समिती, ग्रामपंचायत विभाग अधिकारी, धाऊलवल्ली ग्रामपंचायत आणि सर्वांची एकत्र बैठक घेऊन तोडगा काढण्यात येईल, असे आश्‍वासन दिल्यावर या दोन्ही उपोषणकर्त्यांनी दुपारनंतर उपोषण सोडले. उपोषणकर्त्यांना आश्‍वासनाचे लेखी पत्र धाऊलवल्ली ग्रामपंचायतीचे सरपंच व उपसरपंच यांनी दिले.