Wed, May 22, 2019 22:33होमपेज › Konkan › सिंधुदुर्ग जिल्हाधिकार्‍यांच्या बदलीवरून खडाजंगी

सिंधुदुर्ग जिल्हाधिकार्‍यांच्या बदलीवरून खडाजंगी

Published On: Apr 21 2018 11:15PM | Last Updated: Apr 21 2018 11:01PMसिंधुदुर्गनगरी ः प्रतिनिधी

सिंधुदुर्गचे जिल्हाधिकारी उदय चौधरी यांच्या बदलीवरून शनिवारी झालेली स्थायी समितीची सभा जोरदार गाजली. स्थायी समितीच्या सभेच्या सुरुवातीलाच सदस्य सतीश सावंत यांनी जिल्ह्यात चांगले काम केल्याबद्दल जिल्हाधिकारी चौधरी यांच्या अभिनंदनाचा ठराव मांडतानाच त्यांची बदली वेळेआधी आकसाने झाल्याबद्दल खेद व्यक्‍त केला. या ‘खेद’ विषयावरून शिवसेना सदस्य संजय पडते भडकले आणि सभागृहात संजय पडते विरुद्ध सतीश सावंत आणि उपाध्यक्ष रणजित देसाई अशी जोरदार शाब्दिक चकमक उडाली. केवळ पालकमंत्र्यांच्याच तक्रारीमुळे एका चांगल्या अधिकार्‍याची बदली झाली, त्यामुळे आता पालकमंत्र्यांनी आपल्याला हवा तसा आणि आपलेच ऐकणारा अधिकारी आणावा, असा टोलाही सदस्य सतीश सावंत यांनी लगावला. या शाब्दिक चकमकीचा आस्वाद सभागृहातील सर्वजण शांतपणे घेत होते.

जि.प. स्थायी समितीची सभा शनिवारी येथील बॅ. नाथ पै समिती सभागृहात जि.प. अध्यक्षा सौ. रेश्मा सावंत यांच्या अध्यक्षतेखाली झाली. मुख्य कार्यकारी अधिकारी के. मंजुलक्ष्मी, उपाध्यक्ष रणजित देसाई, समिती सभापती संतोष साटविलकर, प्रीतेश राऊळ, सायली सावंत, शारदा कांबळे, अतिरिक्‍त मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप पाटील, सदस्य सतीश सावंत, संजय पडते, अमरसेन सावंत, सुनील म्हापणकर, राजेंद्र म्हापसेकर, दादा कुबल, अंकुश जाधव, समिती सचिव तथा उपमुख्य कार्यकारी अधिकारी कमलाकर रणदिवे, सर्व खातेप्रमुख, अधिकारी आदी उपस्थित होते.

सभेच्या सुरुवातीलाच जिल्हाधिकारी उदय चौधरी यांच्या मांडलेल्या अभिनंदन ठरावावरुन सतीश सावंत व संजय पडते यांच्यात खडाजंगी झाली.संजय पडते यांनी या विषयानंतर थेट जिल्हापरिषद स्वनिधीच्या विषयाला हात घातला.ते म्हणाले, जि. प. स्वनिधीमधून जो निधी सदस्यांना दिला गेला त्यामध्ये पक्षपातीपणा केला. त्यावर सतीश सावंत यांनी या पक्षपातीपणाची लागण नियोजन समितीपासून लागली असल्याचा आरोप करत नियोजनमधील निधी जास्तीत जास्त सावंतवाडीकडे जातो.  कणकवली, देवगडला देत नाहीत याला काय म्हणायचे? आणि निधी वाटपाची ही पद्धत तुमच्याच सदस्यांनी सुरू केली आहे असेही सुनावले.
जिल्ह्यात कॅन्सरचे रुग्ण  आढळू लागले आहेत. जे तंबाखू खात नाहीत अशा नागरिकांनाही कॅन्सर झाल्याचे दिसून येत असल्याचे सतीश सावंत यांनी सांगून  मुंबईतील टाटा कॅन्सर हॉस्पिटल, डेरवण येथील हॉस्पिटलला कॅन्सर निदान शिबिर लावण्यासाठी पत्र पाठवावे,अशी महत्वपूर्ण सूचना मांडली. आरोग्य अभियानच्या कंत्राटी कामगारांचे गेले दहा दिवस उपोषण सुरु असून  त्याला आमचा पूर्ण पाठिंबा असल्याचे सतीश सावंत यांनी सांगितले.षटकोणी आकाराच्या 207 शाळांपैकी 30 शाळांवर कौले घालण्यासाठी जिल्हाधिकार्‍यांनी मंजुरी दिली असल्याचे सभेत सांगण्यात आले. अध्यक्ष रेश्मा सावंत यांनी यावर तातडीने कार्यवाही करावयाच्या सूचना दिल्या.

पालकमंत्र्यांनी आकसापोटी  बदली केली : सतीश सावंत

सतीश सावंत म्हणाले, ज्या जिल्हाधिकार्‍यांनी सतत दोन वर्षे चांगले काम केले. लोकांचे प्रश्‍न मार्गी लावले. त्यांचीच पालकमंत्र्यांनी आकसापोटी बदली केली आहे.

विनाकारण चुकीचे आरोप करू नका : संजय पडते

पडते यांनी सांगितले, चौधरी यांची बदली ही प्रशासकीय बाब आहे. यात पालकमंत्र्यांचा कोणताही रोल नाही. त्यामुळे विनाकारण चुकीचे आरोप करू नका .