Sun, Jul 21, 2019 00:08होमपेज › Konkan › दोन कंटेनरची भीषण टक्कर; पाच जण ठार

दोन कंटेनरची भीषण टक्कर; पाच जण ठार

Published On: Mar 08 2018 10:35PM | Last Updated: Mar 08 2018 10:09PMमाणगाव : प्रतिनिधी

 मुंबई-गोवा महामार्गावर माणगाव उसरघरनजीक दोन कंटेनरमध्ये भीषण टक्कर होऊन त्यांनी पेट घेतल्याने उसळलेल्या आगडोंबामध्ये पाच जण जागीच ठार झाले. या अपघातामुळे महामार्ग पहाटे जवळपास तब्बल दोन तास ठप्प झाला होता. 

दोन कंटेनरमधील चालक व क्लीनर अशा चौघांचा प्रथम होरपळून मृत्यू झाला. तर या अपघातग्रस्त कंटनर्सना पाठीमागून येणार्‍या मोटारसायकलने जोरदार धडक दिल्याने मोटारसायकलस्वारही जागीच ठार झाला. गुरुवारी पहाटे सव्वापाच वाजण्याच्या सुमारास हा भीषण अपघात घडला. 

अपघाताची माहिती गोरेगाव पोलिस ठाण्यात समजताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन अग्निशमन दलाला पाचारण केले. त्यानंतर आग आटोक्यात आली. गुरुवारी 8 मार्च  रोजी पहाटे 5.15 च्या सुमारास मुंबई-गोवा महामार्गावरून माणगावकडून महाडच्या दिशेने कंटेनर  (एचआर 74 ए 2899) निघालेला असताना उसरघर गावच्या हद्दीत समोरून महाड बाजूकडून माणगावच्या दिशेने जाणार्‍या कंटेनर (आरजे 09 जीबी 8292) ला  जोरात  धडक दिली.
ती एवढी भीषण होती की दोन्ही ट्रकच्या केबिन एकमेकांत घुसून आग लागली. यात दोन्ही ट्रकचे चालक व क्लीनर अशा चार जणांचा अक्षरश: कोळसा झाला. त्यांची ओळख पटणे अवघड होऊन बसले आहे.

याचवेळी गोरेगाव येथून विळे भागाड येथील पोस्को कंपनीमध्ये स्कुटीवरुन कामावर निघालेला मोटारसायकलस्वार  या अपघातग्रस्त कंटेनरवर धडकल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. तुषार तुकाराम गावडे (33) रा. वडगाव कोंड, ता. माणगाव, सध्या रा. गावडे कॉम्प्लेक्स, गोरेगाव  असे त्याचे नाव आहे. या अपघातानंतर दोन तास  मोठी वाहतूक कोंडी झाली होती.

गोरेगाव पोलिसांना घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलिस अधिकारी दत्ता नलावडे, गोरेगाव पोलिस ठाण्याचे  पो.नि. विक्रम जगताप, उपनिरीक्षक प्रभाकर खोत, जाधव, जगताप, कर्मचारी रिठे, प्रमोद काकतकर, गणेश पवार, वाहतूक शाखेच्या कर्मचार्‍यांनी घटनास्थळी धाव घेत अपघातग्रस्त वाहनांना महामार्गावरून दूर करीत वाहतूक सुरळीत केली व मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी 
माणगांव उपजिल्हारुग्णालयात नेले.  अधिक तपास पो.नि. विक्रम जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक एस.टी. जाधव करीत आहेत.  

मृतदेहांचा कोळसा अन् कानठळ्या  बसविणारा आवाज

या अपघातात कंटेनर मधील जळालेल्या चौघांच्या मृतदेहांचा अक्षरशा कोळसा झाला असून त्यांची ओळख पटविणेही मुश्किल झाले आहे. हा अपघात एवढा भीषण होता की, अपघातावेळी मोठा कीरकस कानठळ्या बसणारा आवाज आणि अपघातातील किंकाळ्या आल्याने परिसरातील नागरिक भयभीत झाले. कुणालाही काहीच कळेना. महामार्गावर वाहनांच्या दोन्ही बाजूंनी रांगाच रांगा लांब लागल्या होत्या. परिसरातील काही नागरिकांनी  तसेच महामार्गावरून प्रवास करणार्‍या नागरिकांनी अपघातस्थळी मदतीसाठी एकच धाव घेतली होती. दोन्ही ट्रकने पेट घेतल्याने बघता बघता आगीचा डोंब उसळला. यात महामार्गावर रक्ताचा सडा पडला होता. तर दोन्ही कंटेनरमधील दोन्ही चालक व दोन्ही क्लीनर केबिन मधेच जाळून खाक झाले.