Wed, Apr 24, 2019 15:54होमपेज › Konkan › सख्ख्या भावांचे पाठोपाठ निधन

सख्ख्या भावांचे पाठोपाठ निधन

Published On: Dec 09 2017 1:44AM | Last Updated: Dec 08 2017 10:52PM

बुकमार्क करा

कुडाळ : वार्ताहर

अवघ्या चौवीस तासात दोन सख्ख्या भावांचे हृदयविकाराने निधन झाल्याची हृदयद्रावक घटना माड्याचीवाडी येथे घडली. शुक्रवारी सकाळी 11 वा. मोठ्या भावाला अग्‍नी दिल्यानंतर लहान भावाला अस्वस्थ वाटू लागले. त्यांना खाजगी रूग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले असता त्यांचेही वाटेतच निधन झाले. भालचंद्र विश्राम गावडे (72) व हरेश विश्राम गावडे (62) अशी या भावांची नावे असून या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्‍त होत आहे.

भालचंद्र गावडे हे गुरूवारी सायंकाळी आपल्या नातेवाईकांकडे गेले होते. त्यावेळी त्यांना अस्वस्थ वाटू लागले. त्यांच्यासमवेत असलेल्या दोन्ही मुलांनी त्यांना तात्काळ रिक्षाने खासगी रूग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र, तेथील डॉक्टरांनी त्यांचा मृत्यू झाल्याचे सांगितले. यानंतर त्यांना घरी आणून सकाळी 11 वा. त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यानंतर काही वेळाने त्यांचे लहान भाऊ हरेश यांनाही अस्वस्थ वाटू लागले. त्यामुळे त्यांनाही खाजगी रूग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले. मात्र उपचारापूर्वीच त्यांचे निधन झाल्याचे तेथील डॉक्टरांनी सांगितले. त्यांच्यावर सायंकाळी 4 वा. अंत्यसंस्कार करण्यात आले. अवघ्या चौवीस तासात दोन भावांच्या निधनामुळे सर्वत्र हळहळ व्यक्‍त होत आहे. भालचंद्र गावडे हे घरी शेती व्यवसाय सांभाळत असत. तर त्यांचे लहान भाऊ हे नोकरीनिमित्त मुंबईत अनेक वर्षे वास्तव्यास होते.