Wed, Apr 24, 2019 19:39होमपेज › Konkan › सिंधुदुर्ग : दरोड्यासाठी ‘टीप’ देणार्‍या दोघांना अटक

सिंधुदुर्ग : दरोड्यासाठी ‘टीप’ देणार्‍या दोघांना अटक

Published On: Jun 01 2018 11:01PM | Last Updated: Jun 01 2018 10:28PMकुडाळ ः प्रतिनिधी

निरूखे येथील व्यावसायिक रामदास करंदीकर यांच्या घरावरील दरोडाप्रकरणी पुणे येथील त्या सहा भामट्यांना माहिती देणारे दुसरे तिसरे कुणी नाही तर ते सिंधुदुर्गातीलच असल्याचे अटक असलेल्या आनंद सदावर्ते याच्याकडून पोलिस तपासात उघड झाले आहे. अखेर या प्रकरणी मालवण येथील अमोल दिवाकर  राऊत (वय 43) व कुडाळ  पिंगुळी येथील सचिन नामदेव  पाटील (35) या दोन संशयितांच्या तपासी यंत्रणेने शुक्रवारी सिंधुदुर्गातूनच मुसक्या आवळल्या, अशी माहिती सावंतवाडी उपविभागीय पोलिस अधिकारी दयानंद गवस यांनी दिली.

कुडाळ पोलिस स्थानकात शुक्रवारी  घेतलेल्या पत्रकार परिषदेत श्री. गवस बोलत होते. यावेळी त्यांच्यासोबत कुडाळ पोलिस निरीक्षक अविनाश भोसले उपस्थित होते. श्री. गवस म्हणाले, मालवण येथील अमोल राऊत हा  रामदास करंदीकर यांच्याकडेच कामाला होता. दीड-दोन वर्षांपूर्वीपासून  त्याने  करंदीकर यांच्याकडील काम सोडून  स्वतः करवंदाचा व्यवसाय सुरू  केला होता.  त्याचा पिंगुळी गुढीपूर  येथील  सचिन नामदेव पाटील (35) हा मित्र आहे. अमोल याने सचिन पाटील याला निरूखेतील करंदीकर यांच्याकडे मोठ्या प्रमाणात पैसा  असल्याची माहिती दिली त्यानुसार  पाटील याने आपल्या ओळखीतील  पुणे येथील दरोड्यातील मुख्य सूत्रधार श्रीजीत रमेशन या सहा जणांमधील मंडळींना माहिती दिली. त्या माहितीनुसार  पुणे येथील त्या भामट्यांनी रामदास करंदीकर यांच्या घरावर 22 एप्रिल रोजी आपण अधिकारी असल्याचे भासवून  सिंधुदुर्ग पोलिसांना सोबत घेवून छापा टाकला आणि साडेपाच लाख रूपयाची रोकड लंपास  केली. त्यानंतर ते अधिकारी नसून भामटे होते हे स्पष्ट झाले आणि छापा ऐवजी दरोडा घालण्याचा गुन्हा दाखल झाला.  प्रत्यक्ष या गुन्ह्यात  दरोडा घालताना  अमोल  राऊत व सचिन पाटील या संशयितांनी  सहभाग घेतला  नव्हता. आम्हाला अमोल राऊत व सचिन पाटील यांनीच माहिती दिल्याचे अटक असलेल्या आरोपी क्र. तीन आनंद सदावर्ते यांनी तपासी यंत्रणेला  दिली. त्या माहितीनुसार  अमोल राऊत व सचिन पाटील यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आणि त्यांना वेंगुर्ला येथील न्यायालयात हजर केले असल्याचे श्री. गवस यांनी सांगितले.

कुडाळ तालुक्यातील निरूखे येथील रामदास करंदीकर यांच्या घरावर  पुणे येथील  श्रीजीत रमेशन, पोलिस कर्मचारी अंगरक्षक मोरे, राज यादव, आनंद सदावर्ते, अनिल बनसोडे व इरफान अशा सहा जणांनी सिंधुदुर्ग एलसीपी विभागाला  सोबत घेवून छापा टाकला होता. या विरोधात रामदास करंदीकर यांनी जिल्हा पोलिस अधिक्षकांचे दार ठोठावताच  संशयितावर दरोड्याचा गुन्हा दाखल  झाला आणि संशयिताच्या मागावर पोलिस  उपअधिक्षक दयानंद गवस यांच्या नेतृत्वाखाली टिम रवाना झाली आणि अखेर 18 मे ला सहा भामट्यांपैकी संशयित  आरोपी क्र. 3 आनंद सदावर्ते याला पुणे येथून ताब्यात घेतले होते.   न्यायालयात हजर केले असता  न्यायालयाने  त्याची पोलिस कोठडीत रवानगी केली होती. आनंद सदावर्ते याची कसून चौकशी सुरू आहे. या प्रकरणात आम्हाला  स्थानिकांनी मदत केल्याचे त्याने सांगितले. सदावर्तेच्या सांगण्यावरून  तपासी यंत्रणेने अमोल राऊत व सचिन पाटील यांना ताब्यात घेतल्याने या प्रकरणाला आता खर्‍या अर्थाने गती येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

...त्या पाच जणांच्या पोलिस मागावर!

टिप देणार्‍या स्थनिकांना आम्ही ताब्यात घेतले असल्याने या प्रकरणातील मुख्य सूत्रधार श्रीजीत रमेशन याच्यासह त्याच्या साथीदारांना लवकरच आम्ही पकडू, असा विश्‍वास तपासी अधिकारी दयानंद गवस यांनी व्यक्‍त केला. तसेच या गुन्ह्यात  अन्य स्थानिक कुणी आहेत का? याचीही कसून चौकशी सुरू आहे. या प्रकरणात गुन्हा  अन्वेशनची (एलसीबी) संशयितांना साथ होती असे विचारले असता श्री. गवस यांनी याबाबत माहिती न देता जिल्हा पोलिस अधीक्षकांकडे बोट दाखविले.