Mon, Jan 27, 2020 12:27होमपेज › Konkan › कोट्यवधींची फसवणूक; दोघांना अटक

कोट्यवधींची फसवणूक; दोघांना अटक

Published On: Jun 25 2019 1:34AM | Last Updated: Jun 24 2019 11:41PM
रत्नागिरी : प्रतिनिधी

रत्नागिरी जिल्ह्यातील 1 हजार 404 गुंतवणूकदारांची सुमारे 2 कोटी 33 लाख 97 हजार 37 रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी चिपळूण येथील मातृभूमी ग्रुप ऑफ कंपनीच्या चार संचालकांपैकी दोघांना गुजरातमध्ये अटक करण्यात आली आहे. अन्य दोघे अजून फरार असून त्यांचा शोध पोलिस घेत आहेत.  314 गुंतवणूकदारांची पोलिसांकडून पडताळणी करण्यात आली आहे. त्यांची 39 लाख 94 हजार 590 रुपयांची फसवणूक झाल्याचे निष्पन्‍न झाले असून चिपळूण येथिल इब्राहिम कॉम्प्लेक्समधील कंपनीचे कार्यालय सील करण्यात आले असल्याची  माहिती पोलिस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

संजय हेमंत बिश्‍वास (रा. पूनम सागर कॉम्प्लेक्स, मिरा रोड, ठाणे) आणि विनोदभाई वजीरभाई पटेल (रा. जि. वलसाड, गुजरात) अशी अटक करण्यात आलेल्या संचालकांची नावे आहे. त्यांना गुजरामध्ये अटक करण्यात आली असून ते सध्या लाजपोरे सेंट्रल जेल सुरत येथे न्यायालयीन कोठडीत आहेत.  त्यांना या गुन्ह्यात वर्ग करुन घेण्याची कारवाई सुरु आहे.तर प्रदीप गर्ग (रा.मिरा रोड पूर्व, ठाणे) आणि मिलिंद अनंत जाधव (रा. पाचपाखाडी, ठाणे) हे दोन संचालक अद्याप फरार असून त्यांचा शोध घेण्यासाठी तपास पथके रवाना करण्यात आली आहेत.

याप्रकरणी अरविंद सदानंद मोरे (44, रा.जेलरोड, रत्नागिरी) यांनी चिपळूण पोलिसांकडे तक्रार दिली होती. त्यानुसार, मातृभूमी कंपनीची महाराष्ट्रात 15 ठिकाणी कार्यालये असून चिपळूण येथे 2009 पासून जानेवारी 2019 पर्यंत कार्यालय सुरु होते. या कालावधीत गुंतवणूक केलेल्या रकमेवर 18 टक्के व्याज, मेडिक्‍लेम पॉलीसीमध्ये दरमहा 100 रुपये गुंतवणूकीवर अपघात झाल्यास 20 हजार व मृत्यू झाल्यास 80 हजार दिले जातील असे कंपनीकडून गुंतवणूकदारांना आमिष दाखवण्यात आले होते. या आमिषाला बळी पडून अनेकांनी या कंपनीत गुंतवणूक केली होती.

या गुन्ह्याचा तपास अपर पोलिस अधिक्षक विशाल गायकवाड, उपविभागीय पोलिस अधिकारी सुरज गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली चिपळूण पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक देवेंंद्र पोळ करत आहेत. या गुन्ह्याच्या अनुषंगाने मातृभूमी गु्रप ऑफ कंपनीमध्ये गुंतवणूक करुन फसवणूक झालेल्या गुंतवणूकदारांनी कागदपत्रांसह चिपळूण पोलिस ठाण्यात संपर्क करावा, असे आवाहन पोलिस अधिक्षक डॉ. प्रविण मुंढे यांनी केले.  

पत्रकारांच्या उपोषणाची दखल

खेड येथील पत्रकार मारहाणप्रकरणी बोलताना पोलिस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे म्हणाले,कोणत्याही अवैध धंद्यांना पाठिंबा देण्यात येणार नाही. संशयित सर्व लोकांवर कारवाई करण्यात येत आहे. नागरिकांना अशा धंद्यांची काही माहिती असल्यास पोलिस प्रशासनाला द्यावी, कारवाईत कोणतीही कसूर होणार नाही. खेड येथील पत्रकारांना झालेल्या मारहाणीतील सर्व आरोपींना अटक करण्यात आली असून उपोषणकर्त्या पत्रकारांनी केलेल्या अवाजवी मागण्यांचा विचार करून निर्णय घ्यावा लागणार आहे. त्यासाठी त्यांना असे आवाहन करण्यात येत आहे की, त्यांनी चर्चा करावी. उपोषणाची दखल घेण्यात आली आहे.