होमपेज › Konkan › रत्नागिरी : ट्रक दरीत कोसळून एक ठार

रत्नागिरी : ट्रक दरीत कोसळून एक ठार

Published On: May 15 2018 1:35AM | Last Updated: May 14 2018 11:19PMरत्नागिरी ः प्रतिनिधी

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर हातखंबा येथील दर्ग्याजवळ ट्रकचा ब्रेक निकामी झाल्याने तसेच दुचाकीला वाचवण्याच्या प्रयत्नात 40 फूट दरीत कोसळला. त्यात एकजण ठार झाला असून चालक गंभीर जखमी झाला. या अपघातात ट्रकने दुचाकीला धडक दिल्याने दुचाकीवरून जाणारा तरुण किरकोळ जखमी झाला.  सोमवारी सकाळी  6 वा. सुमारास हा अपघात झाला.

हा ट्रक (एम.एच. 50-0866) हा गोव्याहून मुंबईला सिमेंटची गोणी घेऊन चालला होता. तो हातखंबा दर्ग्याजवळ आला असता त्याने  दुचाकीला मागून धडक दिली. घटना घडले त्या ठिकाणी तीव्र उतार आहे. यावेळी दुचाकीला वाचविण्याच्या प्रयत्नात असताना ट्रकचालकाचे नियंत्रण सुटून त्याचे ब्रेकही निकामी झाल्याने तो 40 फूट खोल दरीत जाऊन कोसळला.

या अपघातात क्लिनर योगेश अण्णाप्पा मडपती (22, रा. नेर्ली, जि. बेळगाव) हा जागीच ठार झाला तर ट्रकचालक यासीन नसीर मुल्ला (22) गंभीर जखमी आहे. अपघातात दुचाकीस्वार दिलीप सीताराम मांजरे (26, रा. सौदळ, राजापूर) हेही किरकोळ जखमी झाले. ते राजापूरहून मुंबईला चालले होते.

अपघाताची माहिती मिळताच जगद‍्गुरू नरेंद्राचार्यजी महाराज  संस्थानच्या नाणीज येथील रूग्णवाहिकेसह शासकीय रुग्णवाहिकेने जखमी तसेच मृताला रत्नागिरीच्या शासकीय रूग्णालयात दाखल केले. अपघातानंतर ट्रकमध्ये अडकलेल्या दोघांना स्थानिक तरूणांनी बाहेर काढले.

अपघातानंतर पोलिस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. महामार्ग वाहतूक शाखेच्या पोलिसांनी वाहतूक सुरळीत केली.