दापोली : प्रवीण शिंदे
सरोवर संवर्धनासाठी रत्नागिरी जिल्ह्यामध्ये कोट्यवधीचा निधी मंजूर झाला असून दापोली तालुक्यामध्ये हा निधी मोठ्या प्रमाणात आला आहे. यामध्ये दापोली तालुक्यातील 7 तलावांचे सुशोभिकरण होणार आहे. त्यामध्ये गावतळे गावातील तलावाचा समावेश आहे. या सरोवराचे सुशोभिकरण झाल्यास सरोवर संवर्धनातून गावतळे गावाचे रूपडे पालटणार आहे. गावतळेतील हा तलाव पुरातन मंदिर झोलाई मंदिरालगत असून तो इतिहासाची साक्ष देत आहे.
त्यामुळे या तलावाचे सुुशोभिकरण झाल्यास येथील क्षेत्र पर्यटन स्थळ म्हणून उदयास येईल. या तलावासाठी शासनाकडून 2 कोटी 10 लाख इतका निधी मंजूर झाला आहे. त्यांपैकी 90 लाखांचा पहिला धनादेश गावतळे ग्रामपंचायतीकडे सुपूर्द करण्यात आला आहे. हा तलाव 1656 सालातील असल्याचे येथील काही जाणकार मंडळींकडून सांगण्यात येत आहे. येथील पुरातन झोलाई मंदिर हे तालुक्यातील 84 गावांचे दैवत आहे असे सांगण्यात येते. त्यामुळे येथील देवीला 84 गावांची मालकीण असेही म्हटले जाते तर येथील भूमी ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झाली असल्याचे सांगितले जाते.
या तलावाचे सुशोभिकरण झाल्यास या ठिकाणालादेखील पर्यटनाचे महत्त्व प्राप्त होईल. या ठिकाणी वॉटरपार्क अशी संकल्पना राबविल्यास ग्रामपंचायतीच्या महसुलात वाढ होऊन या ठिकाणी पर्यटकांचा ओघ वाढू शकतो. तलाव मंजूर करून आणण्यासाठी येथील माजी सभापती श्रीमंत पवार, गावतळे विभाग प्रमुख संजय पवार, सरपंच सेजल संतोष पवार, उपसरपंच विठोबा पवार आणि ग्रामपंचायत सदस्य, ग्रामस्थांनी सहकार्य केले. त्यामुळे 2 कोटी 10 लाख रुपयांचा निधी प्राप्त झाला आहे.