Fri, Jan 24, 2020 23:20होमपेज › Konkan › आता विशेष गाड्यांचेही आरक्षण करा 120 दिवस आधी

आता विशेष गाड्यांचेही आरक्षण करा 120 दिवस आधी

Published On: Jan 18 2018 1:47AM | Last Updated: Jan 17 2018 11:08PM

बुकमार्क करा
तुम्ही जर रेल्वेने प्रवास करणार असाल आणि आरामदायी प्रवासासाठी कन्फर्म तिकीट मिळेल की नाही, या चिंतेत असाल तर रेल्वेने तुमच्यासाठी एक आनंददायी बातमी आणली आहे. आता विशेष तसेच सुविधा दर्जाच्या रेल्वे गाडीचे आरक्षण तुम्हाला 120 दिवस म्हणजेच चार महिने आगाऊ करता येणार आहे.

आतापर्यंत विशेष तसेच सुविधा श्रेणीतील रेल्वे गाड्यांचे आरक्षण कमीत-कमी 10 दिवस तर जास्तीत जास्त 60 दिवस आधी करता यायचे.  मात्र, 15 जानेवारीपासून रेल्वेने विशेष तसेच सुविधा रेल्वे गाड्यांच्या आरक्षणाला लागू असलेल्या या नियमात बदल केला आहे. या निर्णयामुळे अधिकाधिक प्रवाशांना कन्फर्म तिकीट मिळण्याचा मार्ग खुला झाला आहे. 

रांगेत उभे राहूनही गर्दीच्या अनेक मार्गांसाठी कन्फर्म तिकीट न मिळाल्याने बर्‍याचदा प्रवाशांना प्रतीक्षा यादीवरील तिकीट घेऊन गाडीत रिकामे आसन मिळते का, हे शोधत टीटीईला विनंती करावी लागते. मात्र, आता भारतीय रेल्वेने प्रतीक्षा यादीच संपुष्टात आणण्याच्या द‍ृष्टीने पावले उचलली आहेत. रेल्वेतील वेटिंग लिस्टची पद्धत अजून पूर्णपणे निकाली निघाली नसली तरी काही गाड्यांमध्ये  प्रवासी गाडीत बसल्यानंतर त्याच्याकडे तिकीट नसेल तर ‘हॅन्डहेेल्ड’ मशिनच्या सहाय्याने (आसन रिकामी असल्यास) कन्फर्म तिकीट देण्याची सुविधा रेल्वे सुरू  केली आहे. आतापर्यंत विशेष रेल्वे गाड्या तसेच ‘सुविधा’ प्रकारातील गाड्यांचे आगाऊ आरक्षण 10 ते 60 दिवस आधी करता यायचे. मात्र, आता यात बदल करण्यात आला आहे. आता इतर रेल्वे गाड्यांप्रमाणे याही गाड्यांचे आरक्षण तब्बल 120 दिवस आधी करता येणार आहे. 

या निर्णयाचा फायदा रेल्वेसह प्रवाशांनाही होणार आहे. या आधी केवळ दहा दिवस आधी विशेष गाडी जाहीर करून त्यानंतर तिचे आरक्षण खुले होण्याची वाट बघावी लागत होती. आरक्षणासाठी कमी कालावधी मिळाल्याने 15 ते 23-23 डब्यांच्या गाड्या बर्‍याचदा पुरेसे आरक्षण न झाल्याने रिकाम्या पळवाव्या लागत होत्या. मात्र, आता अशा गाड्यांच्या आरक्षणासाठी 4  महिन्यांचा कालावधी उपलब्ध झाल्याने प्रवाशांना अशा गाड्यांचे कर्न्फम तिकीट मिळवून आरामदायी प्रवास करता येणार आहे.

या सुविधेसह प्रीमियम रेल्वे गाडीचे आक्षण रद्द केल्यानंतर तुम्हाला इतर गाड्यांप्रमाणेच तिकिटाचा परतावा मिळणार आहे. आतापर्यंत प्रीमियम ट्रेनचे तिकीट रद्द केल्यानंतर तिकिटाचा परतावा मिळत नसे. रेल्वेने या नियमातही बदल केला असून या निर्णयाचे स्वागत होत आहे.