Tue, Mar 19, 2019 20:29होमपेज › Konkan › कोच कितवा? आसन कुठे?...एम इंडिकेटर असता सोबत चिंता मिटे!

कोच कितवा? आसन कुठे?...एम इंडिकेटर असता सोबत चिंता मिटे!

Published On: May 24 2018 1:32AM | Last Updated: May 23 2018 10:18PMरत्नागिरीः दिपक शिंगण

किफायतशीर तसेच सुरक्षित प्रवासासाठी म्हणून अनेकजण हे रेल्वेगाडीचाच पर्याय निवडताना दिसतात. प्रवासाच्या इतर माध्यमांच्या तुलनेत रेल्वे गाड्यांना होणारी गर्दी ही कमी होण्याऐवजी वाढतानाच दिसते. मात्र, हा रेल्वेचा प्रवास सुरू होण्यापूर्वी ती वेळेवर आहे की नाही, आपण थांबलेल्या स्थानकावर ती किती नंबरच्या फलाटावर येईल इथपासून तिकीट कन्फर्म नसल्यास ते होईल की नाही, कन्फर्म असल्यास आपले आसन असलेला कोच कितवा, आसन खाली असेल की सगळ्यात वर अशी चिंता सतावत असते. त्यातही कुटुंबीयांसह, सामानसुमानासह प्रवास करायचा असेल तर गाडीत चढल्यावर आसन शोधेपर्यंत ही चिंता संपत नाही. एकदा का आपले आसन सापडले की, सुटलो बुवा एकदाचा, अशी आपसुक प्रतिक्रिया उमटते.

सर्वसाधारणपणे नेहमीच्या मार्गावरील नेहमी सुटणार्‍या रेल्वे गाड्यांचा त्या-त्या स्थानकावरील फलाट  आयत्यावेळी अचानक काही बदल झाला नाही तर ठरलेला असतो. तरीही स्थानकावर प्रवासी आपल्याला हवी असलेली गाडी याच फलाटावर येईल ना, याची खात्री करून घेताना दिसतात. बर्‍याचदा स्थानकावर लाऊड स्पीकरवर होणारी उद्घोषणा खरखरणार्‍या आवाजामुळे नेमकेपणाने प्रवाशांना समजत नाही. त्यामुळे कन्फर्म तिकीट असलेल्या प्रवाशांचा गाडीत त्यांचा कोच, नेमके आसन शोधताना गोंधळ उडतो. आता स्मार्टफोनमुळे प्रवासी गाडीची उद्घोषणा, गाडी कोणत्या फलाटावर येणार, कोच पोझिशन कशी असेल यासाठी उद्घोषणेवर अवलंबून राहत नाहीत. यासाठी आज अनेक मोबाईल अ‍ॅप असल्याने  ‘टेक्नोसॅव्ही’ प्रवासी स्वत:च या गोष्टी मोबाईलच्या माध्यमातून जाणून घेतात. तसेही  रेल्वेच्या उद्घोषणा ऐकण्यासाठी त्यांचे कान उघडे असतातच कुठे? कारण बर्‍याचजणांच्या कानात गाणी ऐकण्यासाठीच नव्हे तर संभाषणासाठीही हेडफोन कोंबलेला पहायला मिळतो.

आपण प्रवास करणार असलेली गाडी किती उशिरा धावतेय, तिची कोच पोझिशन, इथपासून अगदी गाडीतील आसन रचना हे सगळं गाडीत बसायच्या आधीच जाणून घ्यायचं असेल तर तुम्हाला ‘एम इंडिकेटर’ अ‍ॅपचे सुधारित व्हर्जन नक्‍कीच फायदेशीर ठरेल.

या अ‍ॅपच्या मदतीने समजा तुम्हाला कोकणातून मांडवी एक्स्प्रेसने मुंबईला जायचे असेल तर तुमच्या स्थानकावर ही गाडी नेमकी किती वाजता येईल, तुमच्या फलाटावर तुमचा कोच नेमका कितवा असेल, आसन कन्फर्म असल्यास ते गाडीत नेमके कुठे येईल, हे सगळं बसल्या ठिकाणी तेही अगदी चुटकीसरशी तुम्हाला या मोबाईल अ‍ॅपच्या मदतीने समजून घेता येईल.

अलिकडे तर रेल्वेकडून स्थानकांवर मोफत वाय-फाय सेवाही पुरवली जाते. त्यामुळे तुमच्या मोबाईलला ‘नेटपॅक’ मारलेला नसला तरीही ही सेवा अ‍ॅक्सेस करुन तुम्ही रेल्वेच्या खिडकीवर चौकशी न करता स्वत:ला अपडेट ठेवू शकता.