Thu, Aug 22, 2019 08:11होमपेज › Konkan › हर्णै बंदरात मच्छीमारांमध्ये संघर्ष

हर्णै बंदरात मच्छीमारांमध्ये संघर्ष

Published On: Jan 20 2018 5:31PM | Last Updated: Jan 20 2018 5:31PMदापोली : प्रतिनिधी

जिल्ह्यातील महत्त्वाचे मासेमारी बंदर असलेल्या हर्णै बंदरात पारंपरिक आणि यांत्रिकी मच्छीमारांमध्ये वाद उफाळून आला आहे. यांत्रिकी मच्छीमार एलईडी लाईटच्या माध्यमातून बंदी असताना मासेमारी करीत असल्याच्या विरोधात गुहागर, दापोली, मंडणगडमधील पारंपरिक मच्छीमार एकवटले असून यांत्रिकी मच्छीमार समुद्रात आढळल्यास त्यांचा प्रतिबंध करू, असा इशारा पारंपरिक मच्छीमारांनी दिला आहे. त्यामुळे पारंपरिक आणि यांत्रिकी मच्छीमारांमध्ये वादाची ठिणगी पडली आहे.

कोकणातील पारंपरिक विरुद्ध यांत्रिकी मच्छीमार यांच्यातील संघर्ष विकोपाला गेला आहे. समुद्रात कोणताही अनुचित प्रकार घडल्यास त्याला शासन जबाबदार राहील, असा इशारा संघर्ष समिती अध्यक्ष अनंत पाटील यांनी दिला आहे.

दापोली, गुहागर, मंडणगड या तीन तालुक्यांतील पारंपरिक संघर्ष समितीने यांत्रिकी मच्छीमारीच्या विरोधात आक्रमक पवित्रा घेतला आहे. एलईडी लाईट मासेमारीप्रकरणी संपूर्ण कोकण किनारपट्टीवर संतापाची लाट पसरली आहे. 12 नॉटिकल मैलच्या बाहेर  मासेमारी करणार्‍या बोटीवर  कारवाई करण्याचे आदेश कोस्टगार्ड विभागाला देण्यात आले आहेत. मात्र, शासनाकडून कोणतीही ठोस कारवाई होत नसल्याने मच्छीमार बांधव आंदोलनाच्या तयारीत आहेत. आंदोलनाची पुढील दिशा ठरविण्यासाठी तीन तालुक्यांतील मच्छीमार बांधव हर्णे बंदरात संघर्ष समितीच्या अध्यक्षतेखाली एकवटले होते. कोकण किनारपट्टी मत्स्य बीजोत्पादन झोन आहे.  

पारंपरिक मच्छीमारांवर उपासमार

एलईडी लाईट व पर्ससीन नेटद्वारे सरसकट  मासेमारी केली जात आहे. त्यामुळे समुद्रातील मत्स्य साठे  कमी होऊन पारंपरिक मच्छीमार बांधवांवर उपासमारीची वेळ येणार आहे. त्यामुळे यांत्रिक मासेमारी बंद व्हावी, अशी मागणी करण्यात आली. शासन या मच्छीमारीकडे डोळेझाक करीत असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला.
समुद्रात बेकायदेशीरपणे सुरू असलेल्या एलईडी लाईट मासेमारी विरोधात लढा तीव्र केला जाणार आहे. रत्नागिरी, कोकण भवन, मंत्रालय  या ठिकाणी वरिष्ठ अधिकारी व मंत्री यांच्यासोबत बैठक झाली. या बैठकीनंतर समुद्रातील गैरप्रकार थांबतील, अशी आशा समितीला होती. मात्र, तसे होताना दिसून येत नाही. त्यामुळे मच्छीमारांना कायदा हातात घ्यायला शासनाने भाग पाडू नये, असा इशारा महाराष्ट्र मच्छीमार कृती समिती राज्य कार्यकारिणी सदस्य व मच्छीमार नेते पांडुरंग चोगले  यांनी दिला आहे.

यावेळी उपाध्यक्ष रऊफ हजवणे, चंद्रकांत खळे, रवी नाटेकर, दत्ताजी वणकर,  गोपीचंद चौगले, पांडू पावसे, अस्लम अकबानी, अश्रफ शेखनाक,  राजन चौगुले यांसह यांच्यासह शेकडो मच्छीमार उपस्थित होते.