Sat, Jul 20, 2019 08:37होमपेज › Konkan › करुळ, भुईबावडा घाटाला वर्षा पर्यटकांची पसंती

करुळ, भुईबावडा घाटाला वर्षा पर्यटकांची पसंती

Published On: Jul 22 2018 10:35PM | Last Updated: Jul 22 2018 10:28PMवैभववाडी : मारुती कांबळे 

तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून कोसळणा-या जोरदार पावसाने तालुक्यातील भुईबावडा व करुळ घाटात अनेक लहान मोठे धबधबे प्रवाहित झाले आहेत. त्यामुळे घाटातील पावसाळी पर्यटनाचा आनंद लुटण्यासाठी हौसी पर्यटक दोन्हीही घाटाकडे वळत आहेत.

हिरवागार शालू परिधान केलेल्या सह्याद्रीच्या पर्वतरांगा, या पर्वतरांगावर पांढरा शुभ्र धुक्याचा हलता थर, उंच कडेकपारीतून खोल दरीत कोसळणारे धबधब्याचे पांढरे शुभ्र फेसाळलेले पाणी, या डोंगरदरीतून नागमोडी वळण घेत जाणारा काळाभोर डांबरी रस्ता, अंगाला झोबणारा गार गार वारा, अधूनमधून येणार्‍या पावसाच्या जोरदार सरीवर सरी.  असे विलोभनीय दृश्य सध्या भुईबावडा व करुळ या दोघेही घाटमार्गात दिसत आहे.  निसर्ग सौंदर्यांचा आस्वाद घेण्यासाठी हौसी व धाडसी पर्यटक पावसाळ्यात घाटमार्गातील या पर्यटनाचा आनंद घेतांना दिसत आहेत.

भुईबावडा घाट हा सुमारे 12 कि.मी.लांबीचा घाट मार्ग असून घाटात सध्या अनेक लहानमोठे धबधबे अगदी ओसंडून वाहात आहेत.  गगळबावड्यापासून 1 कि.मी.अंतरावर पहिलाच धबधबा आहे.उंच कड्यावरुन धबधब्याचे फेसाळणारे पाणी अगदी रस्त्यावर पडते.याशिवाय अगदी घाटातून फेरफटका मारला तरी अनेक धबधब्यांचा आनंद घेता येतो.  या घाटमार्गातून प्रवास करणारे  प्रवाशीही घटकाभर थांबून निसर्गाच्या या मुक्‍त अविष्काराचा आनंद घेतल्याशिवाय पुढे जात नाहीत. भुईबावडा घाटमार्ग अरुंद असल्यामुळे पर्यटकांना पर्यटनाचा आनंद घेत असताना खबरदारी घ्यावी लागते.करुळ घाटमार्गा प्रमाणे भुईबावडा घाटातही पर्यटकांना थांबण्यासाठी पिकनिक पाईंट विकसित करणे आवश्यक आहे.

भुईबावडा घाटमार्गाप्रमाणेच करूळघाट मार्गातून अनेक धबधबे उंच कडेकपारीतून कोसळताना पाहायला मिळतात. घाटातील या सौदर्यांचा पर्यटकांना आनंद घेता यावा यासाठी घाटमार्गात दोन ठिकाणी पिकनिक पाईंट आहेत.  याठिकाणी उभे राहून पर्यटकांना सुरक्षीतपणे पर्यटनाचा आनंद घेता येतो.  त्यामुळे या घाटमार्गात पावसाळ्याप्रमाणे उन्ह्याळ्यातही पर्यटक पर्यटनाचा आनंद घेताना दिसतात. पश्‍चिम महाराष्ट्राला जोडणा-या करूळ व भुईबावडा घाटमार्ग वाहातूकीच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचे आहेत. तितकेच ते पर्यटनाच्या दृष्टीनेही महत्त्वाचे आहेत.विशेषतः पावसाळी पर्यटनासाठी खूप महत्त्वाचे आहेत.त्यासाठी या दोन्हीही घाटमार्गाचा पर्यटनदृष्टया विकास करण्यासाठी सर्व्हे करणे गरजेचे आहे.