Fri, Apr 19, 2019 07:58होमपेज › Konkan › वेंगुर्ले येथील बंद पर्यटन सुविधा केंद्रात चालतात गैरव्यवहार!

वेंगुर्ले येथील बंद पर्यटन सुविधा केंद्रात चालतात गैरव्यवहार!

Published On: Aug 22 2018 12:57AM | Last Updated: Aug 21 2018 10:42PMवेंगुर्ले : वार्ताहर

वेंगुर्ले कॅम्प येथे स्टेडियम शेजारी असलेल्या नगरपरिषद मालकीच्या बंद असलेल्या पर्यटन सुविधा केंद्रात गैरव्यवहार चालत असल्याचे उघडकीस आले असून हा प्रकार नगरसेवक संदेश निकम व तुषार सापळे यांनी प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिला आहे. त्यानुसार नगरपरिषदेने तात्काळा त्या जागेचा पंचनामा करीत वेंगुर्ले पोलिस स्थानकात याबाबत तक्रार दिली आहे व संबंधितांवर कारवाईची लेखी पत्राद्वारे मागणी केली आहे. दरम्यान, याबाबत मुख्याधिकारी वैभव साबळे यांच्याशी संपर्क साधला असता, भाडे थकित असल्याने ही इमारत 12 डिसेंबर 2017 रोजी सील करण्यात आली होती. याबाबत प्रशासनाकडून योग्य ती कारवाई केली जाईल असे त्यांनी सांगितले. 

वेंगुर्ले नगरपरिषदेच्या कॅम्प पॅव्हेलियन परिसरात असलेल्या संगीत रिसॉर्ट ही बहुउद्देशीय इमारत काही महिन्यांपूर्वी नगरपरिषदेने सील केली आहे. मात्र, या इमारतीच्या 2 खोल्या सोडून अन्य खोल्यांची हॅण्डलॉक असलेली साधी कुलुपे तोडून त्याचा स्वतःच्या फायद्यासाठी कोणीतरी उपयोग केला व तेथील साहित्याची नासधूस केली असल्याची माहिती  माजी नगराध्यक्ष तथा विद्यमान नगरसेवक संदेश निकम व तुषार सापळे यांना मिळाली. त्यानुसार त्यांनी स्वतः संगीत रिसॉर्टच्या ठिकाणी जाऊन पहाणी केली. सदर वस्तुस्थिती खरी असल्याचे पत्रकारांच्या निदर्शनास आणले. त्यानुसार  नगरपरिषदेचे मुख्याधिकारी व प्रशासन यांना या संदर्भातील माहिती समजताच प्रशासनाच्या पथकाने या इमारतीची  पहाणी केली व मुख्याधिकार्‍यांना कळविले. सदर वस्तुस्थितीनुसार वेंगुर्ले नगरपरिषदेने  पोलिस स्थानकात रितसर तक्रार दाखल केली आहे. याप्रकरणी चौकशी अंती दोषी आढळणार्‍या संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्याचे तक्रारी नमूद केले आहे. 

वेंगुर्ले नगरपरिषदेची कॅम्प-पॅव्हेलियन भागातील बहुउद्देशीय इमारतीत  सन 2009 पासून कॅम्प म्हाडा येथील रमेश नाईक यांनी करार करुन संगीत रिसॉर्ट हे हॉटेल सुरु केले होते. सदर संगीत रिसॉर्टची थकबाकी नगरपरिषदेकडे होती. याबाबत अलिकडेच झालेल्या कौन्सिल सभेत चर्चा होऊन विशिष्ट रक्‍कम चालकाकडून भरुन घेण्याचे ठरविण्यात आले होते. या संदर्भात रमेश नाईक यांनाही कळविण्यात आले होते. येत्या चार दिवसात रमेश नाईक यांनी भाडेकरार पत्राप्रमाणे जी थकबाकी आहे ती पूर्ण करुन ते नगरपरिषदेच्या ताब्यात देण्याचे स्पष्ट केले आहे. त्या इमारतीत असलेले फर्निचर, खुर्च्या, गाद्या व अन्य साहित्य हे चालविण्यास घेतलेल्या व्यक्‍तीचे म्हणजे रमेश नाईक यांचे आहे. त्यात नगरपरिषदेचे कोणतेही साहित्य नव्हते. सदर इमारतीस तत्कालीन मुख्याधिकारी यांच्या उपस्थितीत सिल करण्यात आले होते. तरीही या इमारतीच्या दुसर्‍या बाजूने लोखंडी कंपाऊंड असताना त्यावरुन प्रवेश करीत हॅण्डलॉकची कुलुपे तोडली गेली व त्याचा अनधिकृत व बेकायदेशीर वापर कोणीतरी केला.