Wed, Feb 26, 2020 10:40होमपेज › Konkan › गुहागर समुद्र किनारा पर्यटकांनी गजबजला

गुहागर समुद्र किनारा पर्यटकांनी गजबजला

Published On: Dec 27 2017 1:22AM | Last Updated: Dec 26 2017 10:33PM

बुकमार्क करा

वरवेली : वार्ताहर

सलग जोडून आलेल्या सुट्ट्या, सरत्या वर्षाला निरोप व नववर्षाच्या स्वागतासाठी गुहागरमध्ये पर्यटकांनी  प्रचंड गर्दी केली आहे. तालुक्यातील सर्व समुद्रकिनारे पर्यटकांनी अक्षरश: गजबजले आहेत. पर्यटक खास कोकणी पद्धतीची  मासळी, कोंबडी-वडा व घरगुती पदार्थांवर ताव मारत आहेत.

तालुक्यातील गुहागर शहर, हेदवी, वेळणेश्‍वर आदी ठिकाणच्या समुद्रकिनारी असलेल्या हॉटेल्समध्ये आरक्षणे फुल्‍ल झाली आहेत. यावर्षी गुहागर येथे बीच फेस्टिव्हल नसल्याने गुहागरला भेट देण्यासाठी आलेल्या पर्यटकांमध्ये नाराजी पसरली आहे. नारळी, पोफळीच्या बागांनी बहरलेले, विस्तीर्ण  व निळसर सागर किनार्‍यांवर पर्यटक मनसोक्‍त आनंद लुटत आहेत.

या वर्षी  ‘थर्टी फर्स्ट’चा दिवस रविवार असल्याने या दिवसाचा पुरेपूर आनंद लुटला जाणार आहे. बहुतांश पर्यटक कोकणातील विविध प्रकारची मच्छी खाण्यासाठी कोकणात येतात. थर्टी फर्स्टची होणारी गर्दी पाहता हॉटेल व घरगुती जेवण बनविणार्‍यांना अगोदरच मत्स्यपदार्थांची ऑर्डर देण्यात आली आहे. नववर्षाचा आनंद लुटण्यासाठी बच्चे कंपनीही तयारीला लागली आहे. गुहागर तालुक्यातील वेलदूरपासून तवसाळपर्यंत पसरलेल्या किनारपट्टीवरील अनेक गावांमधून डोंगर उतारावर अनेक  पर्यटनस्थळे विकसित झाली आहेत. ऑनलाईन बुकिंग सुविधा उपलब्ध असल्याने यावेळी मुंबई, पुण्यातील अनेक पर्यटकांनी या सुविधेचा पुरेपूर लाभ घेतला आहे. यामुळे गुहागर हे पर्यटकांचे पसंतीचे ठिकाण बनले आहे.