Wed, Mar 20, 2019 08:34होमपेज › Konkan › कुंडी घाटामुळे मिळणार पर्यटनाला चालना

कुंडी घाटामुळे मिळणार पर्यटनाला चालना

Published On: Feb 14 2018 2:52AM | Last Updated: Feb 13 2018 10:40PMदेवरूख : नीलेश जाधव

गेली 21 वर्षे रखडलेल्या कुंडी घाटाचे काम पुन्हा सुरू करण्यासाठी पालकमंत्री रवींद्र वायकर यांनी प्रयत्न करण्याचे आश्‍वासन दिले आहे. या घाटामुळे पर्यटनाबरोबरच, दळणवळण व व्यापाराला चालना मिळणार असल्यामुळे विशेष महत्त्व प्राप्‍त झाले आहे.

देवरूख येथील तहसील कार्यालयाच्या नूतन इमारत उद्घाटन प्रसंगी पालकमंत्री वायकर यांनी कुंडी घाटाचे काम मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करण्याचे आश्‍वासन दिले होेते. कुंडी ते उदगीर, कोल्हापूर, सांगली, सातारा, पंढरपूर हा पश्‍चिम महाराष्ट्रातील भाग या घाटामुळे जवळ येणार आहे. त्यामुळे या घाटाचे काम सुरू व्हावे, अशी अपेक्षा कोकणासह पश्‍चिम महाराष्ट्रातील नागरिक व्यक्‍त करीत आहेत.
महिपतगड, टिकळेश्‍वर, मार्लेश्‍वर, कर्णेश्‍वर, संभाजी स्मारक यासह संगमेश्‍वर तालुक्यातील अन्य ठिकाणे पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी वाढू शकते. संगमेश्‍वर तालुक्यातील पर्यटनाला ‘अच्छे दिन’ येऊ शकतात. तसेच पश्‍चिम महाराष्ट्रातून व्यापारी वर्ग कमी खर्चात व कमी वेळेत संगमेश्‍वर तालुक्यात दाखल होतील.

हा घाट मार्गी लागल्यास या घाटाचे विलोभनीय द‍ृश्य पाहण्यासाठी पर्यटकांची हमखास गर्दी होऊ शकते. तसेच पश्‍चिम महाराष्ट्रातून थेट कोकणाला जोडणारा नजीकचा घाट हाच असणार असल्यामुळे पश्‍चिम महाराष्ट्रातून व कोकणातून येणारे जाणारे प्रवाशी याच घाटाचा सर्वाधिक वापर करतील.व्यापार, उद्योग, पर्यटन याची भरभराट या घाटामुळे होणार आहे.  त्यामुळे या घाटाच्या रखडलेल्या कामाकडे गांभीर्याने बघण्याची वेळ आली आहे. डोंगर पोखरून त्यातून घाटासाठी रस्ता खोदण्याचे कठीण काम अद्याप सुरू झालेले नसून केवळ 6 कि.मी.चे कटिंग, माती व खडीकाम झाले आहे.  मोर्‍यांची कमतरता असल्यामुळे काही ठिकाणी रस्ता वाहून गेला आहे. काही ठिकाणी गटारे झाल्यास रस्ता मुसळधार पावसापासून वाचवता येईल.  दरम्यान, डोंगर पोखरून त्यातून मार्ग काढण्याच्या कामाला मोठ्या प्रमाणात निधीची गरज भासणार आहे.

करोडो रूपयांचा निधी हा घाट फोडण्यासाठी लागणार आहे. पालकमंत्री रवींद्र वायकर यांच्यासह सर्वच लोकप्रतिनिधींनी या घाटाच्या रस्ता कामाकडे लक्ष केंद्रित केल्यास लागणारा निधी उपलब्ध करून घेण्यासाठी मदत होणार आहे.