Mon, Apr 22, 2019 16:33होमपेज › Konkan › तोंडवळी-तळाशिल ग्रामस्थांनी रोखला पर्यटन प्रकल्पाचा सर्व्हे

तोंडवळी-तळाशिल ग्रामस्थांनी रोखला पर्यटन प्रकल्पाचा सर्व्हे

Published On: Dec 22 2017 1:26AM | Last Updated: Dec 21 2017 10:35PM

बुकमार्क करा

आचरा : वार्ताहर

‘स्वदेश दर्शन’ योजनेंतर्गत तोंडवळी किनार्‍यावर उभारण्यात येणार्‍या पर्यटन सुविधा प्रकल्पासाठी होणारी जमीन मोजणी गुरुवारी ग्रामस्थांनी बंद पाडली. यासाठी आलेल्या भूमिअभिलेख व महाराष्ट्र  पर्यटन विकास महामंडळाच्या अधिकार्‍यांना तळाशिलवासीयांनी धारेवर धरले.  ग्रामस्थांना विश्‍वासात न घेता जबरदस्तीने होणारी ही मोजणी होऊ देणार नसल्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला. 

ग्रामस्थांचा घेराव 

महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने स्वदेश दर्शन योजनेंतर्गत पर्यटन सुविधा उभारण्याचा प्रकल्प तोंडवळी- तळाशिल किनार्‍यावरील सरकारी मालकीच्या सर्व्हे नं. 77 मध्ये प्रस्तावीत केला आहे.  यासाठी आवश्यक 19 हेक्टर जमिनीच्या मोजणीचे काम 13 डिसेंबरपासून चालू केले होते. मात्र, सीमा निश्‍चितीच्या कामाची सुरूवात गुरूवारी सकाळपासून चालू होणार होते. या जागेत स्थानिक मच्छीमारांच्या होड्या, जाळी ठेवण्यासाठीच्या झोपड्या पूर्वीपासूनच असल्याने  या मोजणीस तोंडवळी - तळाशिल ग्रामस्थांनी  विरोध केला. सकाळी 10 च्या सुमारास मोजणी अधिकारी दाखल होताच तोंडवळीचे नवनिर्वाचित सरपंच आबा कांदळगावकर, उपसरंपच संजय केळुसकर,माजी सरंपच जयहरी कोचरेकर यांच्या नेतृत्वाखाली रवी पाटील, भाऊ जोशी, बाबा तांडेल, प्रतीक्षा पाटील, गजानन तारी, आप्पा हडकर यांच्यासह स्थानिक शेकडो ग्रामस्थांनी मोजणी अधिकार्‍यांना घेराव घालत प्रश्‍नांचा भडिमार करत मोजणी बंद पाडली. यावेळी भूमी अभिलेखचे  अय्याज शेख व ग्रामस्थांमध्ये शाब्दिक चकमक उडाली.

ग्रामस्थ चर्चा करण्यासाठी मंदिरात जमलेले असताना आपण चर्चेसाठी  का आला नाहीत, असा सवाल कत भूमीअभिलेखचे अय्याज शेख, पर्यटन महामंडळाचे पृथ्वीराज जाधव यांना धारेवर धरले. भूमीअभिलेखचे शेख म्हणाले, हे सरकारी काम आहे. 77 सर्व्हे नं. हा सरकारी आहे, आमचे हद्द दाखवण्याचे काम आहे, आम्ही ते करणार, तुम्ही तुमच्या हरकती लेखी स्वरूपात द्या. आम्ही जिल्हाधिकारी यांच्या आदेशाने काम करत आहोत, तुम्हा सरकारी कामात अडथळा आणू नका, असे  शेख यांनी सांगताच  ग्रामस्थांनी आक्रमक होत आम्हाला अटक झाली तरी चालेल, पण मोजणी करू देणार नाही, असा पवित्रा घेतला.

ग्रामस्थ म्हणाले, सर्र्व्हेे नं. 77 हा सरकारचा आहे. मात्र, या जागेवरील आमची वहिवाट शेकडो वर्षांपासून आहे. या जागेत आम्ही मच्छीमार  बांधव रापणीच्या होड्या ठेवण्याची व खारवलेले मासे घालण्याची जागा आहे. समुद्रात जाण्याचा मार्गही या जागेतूनच आहे.ही वहिवाटीची जागा प्रशासनाने ताब्यात घेतली तर आम्ही मच्छीमार व्यवसाय  तरी कसा करायचा? असा सवाल करत वहिवाटीची जमीन पर्यटन प्रकल्पासाठी देणार नसल्याचा निर्धार केला. 

या वादाची माहिती मिळताच  भाजप मच्छीमार  सेलचे रवीकरण तोरसकर दाखल झाले. त्यांनीही भूमोजणी व पर्यटनच्या कर्मचार्‍यांना धारेवर धरत आपण ग्रामस्थांशी संवाद न साधता मोजणी कशासाठी करता? असा सवाल करत आम्हा मच्छीमारांना पर्यटन महामंडळाला जागाच द्यायची नाही. पर्यटन महामंडळ  हे फक्त स्वतःचा विकास करते, मच्छीमारांचा कोणताही नाही.  ही सरकारी जागा आम्हा मच्छीमारांच्या ताब्यात द्या, आम्ही पर्यटनातून विकास साधू असे तोरसकर यांनी सांगताच जमलेल्या मच्छीमार बांधवांनी त्यांना दुजोरा दिला. आपण चालवलेली बळजबरी थांबवा अन्यथा मच्छीमारांच्या रोषाला सामोरे जावे लागेल, असा इशारा पर्यटन महामंडळाच्या अधिकार्‍यांना त्यांनी दिला.