Sun, Apr 21, 2019 05:54होमपेज › Konkan › नाणार रिफायनरी विरोधात आज राजापूर तहसीलवर धडक मोर्चा

नाणार रिफायनरी विरोधात आज राजापूर तहसीलवर धडक मोर्चा

Published On: May 30 2018 2:19AM | Last Updated: May 29 2018 11:06PMराजापूर : प्रतिनिधी

रिफायनरी प्रकल्प रेटवू पाहणार्‍या शासनाला दणका देण्यासाठी ‘भूमिकन्या एकता मंच’च्या वतीने  बुधवार दि. 30 मे रोजी राजापूर तहसील कार्यालयावर धडक मोर्चाचे आयोजन केले आहे. यामध्ये नाणार रिफायनरीविरोधी  सर्व संघटना सहभागी होणार आहेत. 

गेले वर्षभर विनाशकारी रिफायनरी प्रकल्पाविरुद्ध जोरदार आंदोलने सुरू आहेत. राजापूर तालुका व पर्यायाने कोकणच्या मुळावर हा प्रकल्प आला असून त्यामुळे सुमारे 12 लाख हापूस आंब्यासह 10 लाखांच्या आसपास काजू व विविध प्रकारची झाडे उद्ध्वस्त होणार आहेत. त्यामुळे कोकणी माणसाचे अतोनात आर्थिक नुकसान होणार असल्याने प्रकल्प परिसरातील चौदा गावांचा कडाडून विरोध आहे. पण शासन आपल्या भूमिकेशी ठाम असून त्यांना प्रकल्प रेटून न्यायचा आहे. त्यामुळे संतापलेली जनता मागे हटायला तयार नाही. त्यामुळे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी पुन्हा मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. 

दि. 30 मे रोजी राजापूर तहसील कार्यालयावर ‘भूमिकन्या एकता मंच’ च्या नेतृत्वाखाली मोर्चा काढण्यात येणार आहे. सकाळी 10 वाजता शहरातील राजीव गांधी मैदानातून मोर्चाला प्रारंभ होईल. त्यानंतर तहसील कार्यालयावर धडक देऊन शासनाने जनभावनांचा आदर राखत रिफायनरी प्रकल्प रद्द करावा, अशा आशयाचे निवेदन सादर केले जाणार आहे.

यापुर्वी रिफायनरी विरोधात असाच मोर्चा काढण्यात आला होता. पण तो पक्षविरहीत होता. आता हा मोर्चाही पक्षविरहीत असेल का? याकडे अनेकांचे लक्ष लागून राहिले आहे. दरम्यान, मोर्चाचे स्वरुप लक्षात घेऊन प्रशासन सज्ज झाले आहे.