Sun, Apr 21, 2019 03:50होमपेज › Konkan › वर्षा पर्यटनाला जा, पण काळजी घ्या!

वर्षा पर्यटनाला जा, पण काळजी घ्या!

Published On: Jun 29 2018 8:43PM | Last Updated: Jun 29 2018 8:34PMकणकवली : नितीन कदम

मान्सूनचे आगमन होताच डोंगरदर्‍यांतील धबधबे प्रवाहीत होतात. निसर्गही हिरवाकंच बाहू पसरून या नव्या साजाचे स्वागत करतो. साहजिकच या पावसाळी वातावरणात पर्यटकांना ओढ लागते ती वर्षा पर्यटनाची. शेकडो फूट उंचीवरून कोसळणारे धबधबे, दोन्ही तिरांनी ओसंडून वाहणार्‍या नद्या, तुडुंब भरलेले जलाशय आदी ठिकाणी तर या वर्षापर्यटकांना साद घालत असतात. पण अनेकवेळा पर्यटकांचा अतिउत्साह व फाजील आत्मविश्‍वास त्यांच्यासाठी जीवघेणा ठरतो. गेल्या काही वर्षात सिंधुदुर्ग जिल्ह्यात वर्षा पर्यटन वाढू लागले आहे. मात्र, त्याचबरोबर पर्यटनस्थळांवरील दुर्घटनांमध्येही वाढ होताना दिसत आहे. यासाठी वर्षा पर्यटकांनी व प्रशासनानेही काळजी घेणे आवश्यक आहे.

सिंधुदुर्गात वर्षा पर्यटनासाठी प्रामुख्याने धबधब्यांना पसंती मिळते. यासाठी आंबोली हे तर देशभरातील वर्षा पर्यटकांचे डेस्टीनेशन आहे. त्याचबरोबर मांगेली, सावडाव, सैतवडे, वालावल या धबधब्यांबरोबरच करूळ व फोंडाघाटातील धबधबे वर्षा पर्यटनासाठी नावारुपास येत आहेत. पैकी आंबोली येथे वर्षा पर्यटनाचा आनंद लुटताना काहींनी आपला जीव गमावला आहे, तर कित्येक जण जायबंदी, जखमी झाले आहेत. धबधब्यांच्या दिशेने चढण्याच्या प्रयत्नात पाय घसरून खाली पडणे, धबधब्यावरील दगड निसटून पडणे, सेल्फीच्या नादात दरीत कोसळणे, मद्याच्या नशेत स्टंटबाजी करणे अशा प्रयत्नात या दुर्घटना घडत आहेत.

गेल्या वर्षी 31 जुलै रोजी आंबोली-कावळेसाद पॉईंट येथे गडहिंग्लज येथील इम्रान गारदी व प्रताप उजगरे हे दोन तरूण दरीच्या काठावर उभे राहून स्टंट करताना मद्याच्या नशेत हजारो फूट खोल दरीत कोसळले. त्यांच्या या कृतीचा व्हायरल झालेला व्हिडीओ अंगावर शहारे आणणारा होता. तर 29 जुलै रोजी गोवा येथील प्रवीण नाईक हा तरूण कावळेसाद येथील संरक्षक भिंतीवर उभा राहून माकडांना खाऊ घालण्याच्या प्रयत्नात दरीत पडला होता. सुदैवाने त्याला स्थानिक ट्रेकर्स व पोलिसांनी सुखरूप बाहेर काढले होते. आंबोली मुख्य धबधब्यावरील खडकांवर उभा राहून सेल्फी काढण्याच्या प्रयत्नात सोलापूर येथील कृणाल फडतरे हा तरूण घसरून पडल्याने गंभीर जखमी झाला होता. तर काही दिवसांपूर्वी आंबोली घाटमार्गावर सेल्फी काढण्याच्या नादात पुणे येथील एक पर्यटक शेकडो फूट दरीत पडला होता. केवळ दैव बलवत्तर म्हणून तो वाचला होता. तर धबधब्यावरील  निसरड्या खडकांवरून पाय घसरून पडल्याने जखमी होण्याचे प्रकार सातत्याने घडत असतात. 

अशा दुर्घटना घडण्यामागे पर्यटकांचा विशेषतः तरूणांचा अतिआत्मविश्‍वास व फाजीलपणा कारणीभूत असल्याचे दिसून येते. अनेकवेळा तरूणांचे ग्रुप वर्षा पर्यटनासाठी बाहेर पडतात. या पर्यटनाचा आनंद लुटण्याबरोबरच मद्यपानाचा आनंद लुटण्यासाठी ते आतुरलेले असतात. या नशेतच ते स्टंटबाजीचा प्रयत्न करतात. काहीवेळा या नशेत वाहन वेगाने चालवून ते अपघातास कारणीभूत ठरतात. काही महाविद्यालयीन तरूण घरी न सांगता पर्यटनस्थळांवर जातात. तेथे त्यांना रोखणारे कोणी नसते. हे तरूण धोकादायक पर्यटक करून अपघातांना निमंत्रण देतात. अनेक पर्यटनस्थळांवर पोलीस बंदोबस्त असतो किंवा स्थानिक गार्ड तैनात असतात. मात्र, त्यांच्या सुचनांकडे दुर्लक्ष करत हे तरूण धोकादायक ठिकाणी जाण्याचा प्रयत्न करतात. नदी किंवा तलावाकाठी पर्यटनास जाणार्‍या काही पर्यटकांना पोहण्याचा मोह आवरत नाही. नदीपात्राची किंवा तलावाची माहिती नसल्याने तसेच पोहता येत नसल्याने हे पर्यटक पाण्यात बुडून जीव गमावतात. 

अतिधाडस टाळा

पावसाळ्यात धबधबे, जंगल, तलाव आदी ठिकाणी ट्रेकिंग किंवा पर्यटनाला जाताना पर्यटकांनी नको ते धाडस करणे टाळायला हवे. अशा ठिकाणी पावसामुळे शेवाळ निर्माण होऊन पायवाटा, खडक, दगड निसरडे झालेले असतात. त्यामुळे पाय घसरून दुर्घटना होण्याची शक्यता असते. म्हणूनच वर्षा पर्यटनास जाताना खाद्यपदार्थांबरोबरच सुरक्षा साधनेही सोबत असणे तितकेच गरजेचे आहे.

सेल्फीचा मोह आवरा

आता ज्याच्या त्याच्या हातात अ‍ॅन्ड्रॉईड मोबाईल फोन आले आहेत. साहजिकच आपण कुठेही गेलो तरी फोटो काढण्याचा व विशिष्ट गोष्टींसोबत सेल्फी घेण्याचा मोह आवरत नाही. मात्र वर्षा पर्यटनस्थळांवर हाच मोह जीवघेणा ठरू शकतो. विशेषतः धोकादायक पार्श्‍वभूमीवर सेल्फी घेणे म्हणजे मृत्यूस आमंत्रण देण्यापेक्षा कमी नाही. यासाठी  वर्षा पर्यटकांनी सेल्फीचा मोह आवरणे आवश्यक आहे.