Tue, Jun 25, 2019 13:07होमपेज › Konkan › कणकवली बाजारपेठेत तीन चोरट्यांना अटक

कणकवली बाजारपेठेत तीन चोरट्यांना अटक

Published On: Feb 21 2018 1:20AM | Last Updated: Feb 20 2018 9:55PMकणकवली : प्रतिनिधी

मंगळवारच्या कणकवलीतील आठवडा बाजारादिवशी रमाकांत लक्ष्मण डेगवेकर (रा. कणकवली) यांच्या दुकानात शांपू पाकीट घेण्याचे निमित्त करून त्यांच्या खिशातील 300 रुपये परस्पर चोरून पोबारा करण्याच्या प्रयत्नात असलेल्या तीन चोरट्यांना व्यापारी व ग्रामस्थांनी चोप देऊन पोलिसांच्या ताब्यात दिले. ही घटना दुपारी दीड वा.च्या सुमारास घडली. हे तिन्हीही चोरटे अल्पवयीन असून त्यांना बुधवारी बाल न्यायालयात हजर केले जाणार आहे. सोमवारी दोडामार्ग आठवडा बाजारात अशाच तीन चोरट्यांना व्यापारी व ग्रामस्थांनी पोलिसांच्या ताब्यात दिले होते. हे सर्व चोरटे परप्रांतीय असून त्यांची टोळी सक्रिय असल्याची शक्यता पोलिस सूत्रांनी व्यक्त केली.

मंगळवारी कणकवलीचा आठवडा बाजार असल्याने बाजारात नेहमीप्रमाणे गर्दी होती. याच गर्दीचा फायदा घेऊन चटई विकणारे मध्यप्रदेशमधील तीन युवक दुपारी दीडच्या सुमारास कणकवली बाजारपेठेतील रमाकांत डेगवेकर यांच्या दुकानात आले. 

यावेळी डेगवेकर आणि त्यांचे दोन कामगार दुकानात होते. चोरट्यांनी दहा रूपये देवून शांपू पॉकेट खरेदी केली. मात्र चोरीच्या बहाण्याने आलेल्या या चोरट्यांनी तेथून जावून पुन्हा येत शांपू पाकीट फाटले आहे असे सांगितले. रमाकांत डेगवेकर हे शांपू पाकीट पाहत असताना त्यांच्या नकळत त्यांच्या शर्टाच्या खिशातील 300 रूपये या चोरट्यांनी चोरून पळून जाण्याचा प्रयत्न केला. हा प्रकार लक्षात येताच दुकानातील कामगारांनी चोरट्यांचा पाठलाग करून त्यांना पकडले. यावेळी स्थानिकांनी त्यांना चांगलाच चोप देत पोलिसांच्या हवाली केले. पोलिसांनी त्यांची मेडिकल चाचणी केली असता ते अल्पवयीन असल्याचे निष्पन्न झाले. त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून बुधवारी त्यांना बाल न्यायालयात हजर करून सुधारगृहात त्यांची रवानगी केली जाणार आहे. याप्रकरणाचा तपास पोलिस उपनिरीक्षक धनंजय चव्हाण करत आहेत.