Fri, Jul 19, 2019 00:56होमपेज › Konkan › भरदिवसा गाडीच्या डिकीतून साडेतीन लाखांची चोरी(व्हिडिओ)

भरदिवसा गाडीच्या डिकीतून साडेतीन लाखांची चोरी(व्हिडिओ)

Published On: Jul 02 2018 9:21PM | Last Updated: Jul 02 2018 9:21PMरत्नागिरी : प्रतिनिधी

शहरातील मारुती मंदिर परिसरातून भरदिवसा दुचाकीच्या डिकीतून सुमारे 3 लाख 50 हजार रुपयांची रोख रक्कम लांबवण्याचा धक्कादायक प्रकार सोमवार 2 जुलै रोजी दु.12 वा. सुमारास घडला. या प्रकरणी शहर पोलिसांनी चार संशयित आरोपींविरोधात शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत जगन्नाथ सिताराम जंगम (44, रा. घाग स्वामी मठ नाचणे,रत्नागिरी) यांनी शहर पोलिसांकडे तक्रार दिली आहे. त्यानुसार, जगन्नाथ जंगम हे आंबा व्यापारी संजय मुळ्ये यांच्याकडे कामाला आहेत. त्यांच्या घरी भाजीपाला आणणे, बँकेतून पैसे काढणे ही कामे ते करतात. सोमवारीही संजय घाग यांनी जंगम यांच्याकडे 3 लाख 50 हजार रुपयांचा चेक देवून बँकेतून पैसे काढण्यास सांगितले होते. त्यानुसार, जंगम अ‍ॅक्सेस दुचाकीवरुन गोडबोले स्टॉपजवळील आयसीआयसीआय बँकेत चेक वठवण्यासाठी गेले होते. 

बँकेतून पैसे काढून बाहेर आपल्यावर ते भाजीपाला घेण्यासाठी मारुती मंदिर परिसराच्या दिशेने निघाले असता त्यांना दोन दुचाकिंवरुन चार जण त्यांचा पाठलाग करत असल्याचा संशय आला होता. परंतू त्याकडे दुर्लक्ष करत ते शिवाजी स्टेडियम बाहेरच्या भाजीवाल्याकडे भाजी घेण्यासाठी गेले होते. दरम्यान दुचाकीची चावी काढून घेण्यास ते विसरले. जंगम भाजी घेण्यात गुंतलेले असताना याच संधीचा फायदा उठवत त्यांच्यामागून येणार्‍या दुचाकीवरील संशयित आरोपींनी दुचाकीच्या डिकीतील साडेतीन लाख रुपयांची रोकड लांबवली. डिकितील पैसे चोरीस गेल्याचे लक्षात येताच जंगम यांनी शहर पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दिली. शहर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपासाला सुरुवात केली. हा सर्व प्रकार तेथिल एका दुकानाच्या सीसीटिव्ही कॅमेर्‍यात कैद झाला. या फुटेजमध्ये तीन संशयित आरोपी दिसत आहेत. सीसीटिव्ही फुटेजच्या आधारे शहर पोलिस तपास करत आहेत.