Sun, Aug 25, 2019 04:26होमपेज › Konkan › सिंधुदुर्ग : कुपन स्क्रॅच करणारे तिघे परप्रांतीय पोलिसांच्या ताब्यात

सिंधुदुर्ग : कुपन स्क्रॅच करणारे तिघे परप्रांतीय पोलिसांच्या ताब्यात

Published On: Jun 02 2018 11:13PM | Last Updated: Jun 02 2018 10:25PMकुडाळ ः वार्ताहर

‘कुपन स्क्रॅच करा वस्तू मिळवा’ अशी जाहीरात करून महागड्या वस्तूंचे आमिष दाखवून दर्जाहीन वस्तू देवून ग्राहकांना फसवणार्‍या तिघा परप्रांतियांना कुडाळमधील  काही सजग  नागरिकांनी  दणका दिला. या तिघांनाही ताब्यात घेत कुडाळ पोलिसांच्या स्वाधीन केले. 

कुडाळ शहरासह ग्रामीण भागातही या मार्केटींग करणार्‍यांनी आपले जाळे  विणले आहे. शंभर रू. चे कुपन स्क्रॅच  करा व त्यात कुपनमधील वस्तू मिळवा असे सांगत एक रंगीत कार्ड पुढे केले जाते व त्यावर मिक्सर, टीव्ही, कॉम्प्युटर, वॉशिंग मशीन, इस्त्री यासारख्या महागड्या वस्तू असतात व ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी वस्तू न मिळाल्यास पैसे परत असेही सांगितले जाते. परप्रांतीय या इसमाचा हा व्यवसाय गेली अनेक वर्षे सुरू आहे. शंभर रूपयात एवढ्या मोठ्या  किंमतीच्या वस्तू मिळत असल्याने  ग्रामीण भागातील सर्वसामान्य लोक याला सहज बळी पडतात. मात्र या लोकांनी आता शहराकडेही आपला मोर्चा वळवला. यातील काही ग्राहकांना शंभर रूपयात महागड्या वस्तूंची लॉटरीही लागते. या वस्तू मागाहून घरपोचही केल्या जातात. मात्र प्रत्यक्षात या वस्तू पूर्णतः बोगसच असल्याचे काही दिवसातच निष्पन्‍न झाले आहे. मात्र तोपर्यंत या  लोकांनी दुसर्‍या  ठिकाणी आपला मोर्चा वळवलेला असतो. मात्र कुडाळमधील काही नागरिकांनी यातील तिघांना पकडण्यात यश मिळवले. या तिघांना ताब्यात घेत पोलिसांच्या ताब्यात दिले.

या परप्रांतीय युवकांनी कुडाळातच या वस्तूंचे एक गोडावून तयार केले आहे. या वस्तू घरपोच करण्यासाठी कुडाळमधीलच एका युवकाची ओमनी  भाड्याने घेतली आहे. पोलिसांनी या तीन युवकासह या ओमनी चालकाचीही चौकशी केली. मात्र या युवकांचे मोठे रॅकेट असून या रॅकेटच्या मुळाशी जावून पोलिसांनी चौकशी सुरू केली आहे. या प्रकरणाचा मुख्य कोण आहे? याची विचारणा  या युवकांकडे करत त्याला त्वरीत पोलिस स्थानकात बोलवून घेण्यास सांगण्यात आले आहे. महागड्या वस्तुंच्या नावाने बनावट वस्तूंची  विक्री करून त्यातून  मोठ्या प्रमाणात अर्थार्जन करण्याचा धंदा सुरू आहे. ग्राहकांना वस्तू तर मिळतात. मात्र त्या काही दिवसच चालतात तर काहींच्या वस्तू चालतच नाही. त्यामुळे होत असलेली फसवणूक सर्वसामान्यांना आर्थिक फटका देणारी  आहे. पोलिसांनी केवळ कुडाळमधीलच नव्हे तर जिल्ह्यातील हा प्रकार बंद करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.