Sat, Mar 23, 2019 12:29होमपेज › Konkan › दापोलीत 5 बंद फ्लॅट फोडून चोरट्यांच्या पदरी निराशाच

दापोलीत 5 बंद फ्लॅट फोडून चोरट्यांच्या पदरी निराशाच

Published On: Jan 29 2018 11:23PM | Last Updated: Jan 29 2018 11:23PMदापोली : वार्ताहर 

शहरातील तीन गृहनिवास सोसायट्यांमधील तब्बल 5 बंद फ्लॅट फोडून अज्ञात चोरट्यांनी दापोली पोलिसांसमोर आव्हान उभे केले असले तरी प्रत्यक्षात या चोरट्यांच्या हाती कोणताही ऐवज लागला नाही. मात्र, या अज्ञात चोरट्यांनी आपले अस्तित्व दाखवून दिले असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. 

दापोली शहरामध्ये गेल्या काही दिवसांपासून अज्ञात चोरट्यांनी उच्छाद मांडला असून हे चोर भुरट्या चोर्‍या करत आहेत. दापोलीतील अनेक टपर्‍या हे त्यांचे प्राथमिक लक्ष्य होते. या शिवाय घराबाहेर ठेवलेल्या वस्तूही हे चोरटे लांबवत होते. दरम्यान, आज दापोली शहरातील चिंतामणी कॉम्प्लेक्स मधील संतोष सावर्डेकर यांचा बंद फ्लॅट फोडला. त्याचप्रमाणे समर्थ निवास इमारतीतील रत्नाकर भागवत व संजय मांढरे तर उर्मिला सोसायटीमधील संतोष चव्हाण व गोपीचंद जाधव यांचेही फ्लॅट अज्ञात चोरट्यांनी फोडले. मात्र, चोरट्यांच्या हाताला काहीही लागलेले नाही. चिंतामणी कॉम्प्लेक्समधील विनय मोरे यांनी  पोलिस ठाण्यात याबाबत माहिती दिली आहे. दरम्यान, पोलिसांच्या नाकावर टिचून महिनाभरात चोरट्यांनी दुसर्‍यांचा दापोलीत हातसफाई करण्याचा प्रयत्न केल्याने पोलिस प्रशासनाकडून रात्री घालण्यात येत असलेल्या गस्तीवर नागरिकांकडून प्रश्‍न उपस्थित करण्यात येत आहे. याचा तपास सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक अनिल चांदणे करत आहेत.