Wed, Jan 29, 2020 22:39होमपेज › Konkan › आठ सदनिकांसह बंगला फोडला

आठ सदनिकांसह बंगला फोडला

Published On: May 11 2018 1:38AM | Last Updated: May 10 2018 10:48PMचिपळूण : खास प्रतिनिधी

चिपळुणात चोरट्यांनी धुमाकूळ घातला असून सलग दुसर्‍या दिवशी आठ सदनिका व एक बंगला फोडल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. यामध्ये रोख रकमेसह एक लाखाचा मुद्देमाल चोरट्यांनी लंपास केला आहे. पंधरा दिवसांच्या कालावधीत शहर परिसरात तब्बल 32 घरफोड्या झाल्याने पोलिस चोरट्यांपुढे हतबल झाले आहेत.

मंगळवारी रात्री चोरट्यांनी गुहागर नाका परिसरात 17  सदनिका फोडल्या.  या प्रकाराने शहरात एकच खळबळ उडाली. मात्र, त्याच्याच दुसर्‍या रात्री म्हणजेच बुधवारी शहरालगतच्या कापसाळ हद्दीतील तीन 

इमारतींमधील आठ सदनिका व पेठमाप येथील एक बंगला फोडल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी दोन महिलांनी चिपळूण पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. मुंबई-गोवा महामार्गालगत बाळासाहेब माटे सभागृहाशेजारी असलेल्या ‘औदुंबर अपार्टमेंट’मधील दोन, ‘अवधूत’मधील एक तर रस्त्याच्या पलीकडील ‘द्वारका रेसिडेन्सी’ या इमारतीमधील पाच सदनिका चोरट्यांनी फोडल्या. ‘अवधूत अपार्टमेंट’मध्ये राहणार्‍या दीपाली प्रमोद ठसाळे यांची सदनिका चोरट्यांनी फोडून घरातील रोख सात हजार रूपये व सोन्या-चांदीच्या दागिन्यांसहीत 73 हजारांचा ऐवज लंपास केला. सदनिकेच्या मुख्य दरवाजाची कडी तोडून घरातील कपाट फोडून चोरी करण्यात आली.

‘औदुंबर अपार्टमेंट’मधील शीतल सुदेश भालेकर यांची सदनिका फोडून चोरट्यांनी वीस हजारांची रोख रक्‍कम लांबवली. याच इमारतीमधील आणखी एक सदनिका फोडली. मात्र, चोरट्यांच्या हाताला काही लागले नाही. रस्त्याच्या पलीकडील ‘द्वारका रेसिडेन्सी’मध्ये पाच सदनिका फोडल्या. यामध्ये रवी टोपरे, पाटील व जोशी व अन्य दोन सदनिका फोडण्याचा प्रयत्न झाला. परंतु, येथील नागरिकांच्या किमती वस्तू चोरण्यात चोरट्यांना अपयश आले. शहरातील पेठमाप भागातील एक बंगला चोरट्यांनी फोडला. परंतु, या ठिकाणीही चोरट्यांच्या हाताला काही लागले नाही. अवघ्या पंधरा दिवसांत 32 घरफोड्या झाल्याने पोलिस प्रशासन खडबडून जागे झाले आहे. सुट्ट्यांमुळे बंद असलेल्या घरांवरच चोरट्यांनी वक्रद‍ृष्टी वळवली आहे. त्यामुळे पोलिसांनी रात्रीच्या गस्तीमध्ये वाढ केली आहे. या प्रकरणी अधिक तपास पोलिस निरीक्षक इंद्रजित काटकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक शेळके करीत आहेत.

पोलिसांच्या हातावर चोरट्यांची तुरी

महामार्गालगतच्या कापसाळ यशोधननगर येथे चोरट्यांना मध्यरात्री पोलिसांनी हटकले. मात्र, हे चोरटे पळून जाण्यात यशस्वी झाले. एका पोलिस हवालदाराने या चोरट्यांचा पाठलाग केला. परंतु, जंगलामध्ये पळून जाण्यात यशस्वी झाले. येथील ‘द्वारका रेसिडेन्सी’मधील सीसीटीव्ही कॅमेर्‍यात हे चोरटे कैद झाले आहेत. परंतु, सीसीटीव्हीत आपण ओळखून येणार नाही याची त्यांनी पूर्ण खबरदारी घेतली आहे. त्यामुळे हे सराईत चोरटे असावेत. शिवाय या चोरट्यांना शहरातील बंद सदनिकांची माहिती देणारा स्थानिक असावा, असा अंदाज व्यक्‍त होत आहे.