Wed, Jan 29, 2020 22:27होमपेज › Konkan › चिपळुणात रात्रीत १७ सदनिका फोडल्या

चिपळुणात रात्रीत १७ सदनिका फोडल्या

Published On: May 10 2018 1:36AM | Last Updated: May 09 2018 10:40PMचिपळूण : खास प्रतिनिधी

मे महिन्याची सुट्टी आणि लग्‍नसराईनिमित्त गावाकडे गेलेले असताना चिपळुणात मंगळवारी (दि. 8) एकाच रात्री तब्बल 17 सदनिका चोरट्यांनी फोडल्या आहेत. चोरट्यांच्या हाताला सुमारे दोन लाखांचा ऐवज लागला आहे. या धाडसी चोरीच्या सत्रामुळे चिपळुणात खळबळ उडाली आहे.

शहरातील गुहागर नाका परिसरातील चार गृह संकुल, पेठमापमधील एका इमारतीमधील अशा एकूण 17 सदनिका चोरट्यांनी फोडल्या. सदनिकांधारक सुट्टीनिमित्त गावाला गेलेले असताना मंगळवारी रात्री दोन ते पाच वाजण्याच्या दरम्यान चोरट्यांनी डल्ला मारण्याचा प्रयत्न केला. परंतु, त्यांच्या हाताला फारसे काही लागले नाही. या चोर्‍यांमुळे नागरिक भयभीत झाले असून पोलिसांच्या रात्रीच्या गस्तीबाबत प्रश्‍नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे.

शहरातील गुहागर नाका येथील ‘शबनम अपार्टमेंट’मधील नदिम दिवेकर (मूळ रा. नवानगर) यांच्या सदनिकेच्या दरवाजाची कडी तोडून चोरट्यांनी आत प्रवेश केला. परंतु, दिवेकर यांनी किमती ऐवज आपल्याबरोबर नेल्याने चोरट्यांच्या हाताला काही लागले नाही. जायना तजम्मुल चौगुले यांची सदनिकाही फोडण्यात आली आहे. शबनम इमारतीलगत ‘आफरीन अपार्टमेंट’मधील सदनिकाही चोरट्यांनी फोडल्या. पेठमाप उर्दु मराठी शाळेवर शिक्षिका असलेल्या जाहिदा नायकवडी या आपल्या कुटुंबासह रत्नागिरी येथे गेल्या असता चोरट्यांनी सेफ्टी डोअर तोडून व मुख्य दरवाजाची कडी तोडून आत प्रवेश केला. पाच तोळे सोने व वीस हजारांची रोख रक्‍कम लांबवली. तसेच याच इमारतीमधील मुबीन सुर्वे व नदीम तांबे या दोघांच्या सदनिका चोरट्यांनी फोडल्या. मुबीन तांबे हे लग्‍नानिमित्त गावाला गेले असता घरातील तीन हजार रुपये व मुलांनी मनी बँक म्हणून जमा केलेले पैशांचे तीन डबे चोरट्यांनी लांबविले. रहिमा अकील चौगुले तसेच ‘हाजिरा पॅलेस’ इमारतीमधील अब्दुल रहेमान इब्राहिम घारे यांची सदनिका फोडून चोरीचा प्रयत्न झाला. 

गुहागर रस्त्यानजीक गुहागर नाका येथील ‘रश्मी प्‍लाझा’ या इमारतीमधील तब्बल सात सदनिका चोरट्यांनी फोडल्या. यामध्ये अ‍ॅड. अल्ताफ दलवाई यांचे कार्यालयदेखील चोरट्यांनी फोडले. मात्र, त्यांच्या हाती काहीही लागले नाही. या इमारतीमधील समीर फकीर महंमद माहिमकर यांची सदनिका फोडून चोरीचा प्रयत्न झाला. समिरा बिलाल सरगुरोह यांची सदनिका फोडून नऊ हजारांची रोकड, इरफान वावेकर व शफीक सरगुरोह यांच्याही सदनिका फोडण्यात आल्या. याच इमारतीमधील अक्रम खान यांची बंद सदनिका फोडून चोरट्यांनी सुमारे पंधरा हजारांची रोकड लांबवली. मुबीन रूमाणे यांचीही सदनिका चोरट्यांनी फोडली.

शहरातील पेठमाप भागातील ‘शाहीन अपार्टमेंट’मधील तीन सदनिका फोडण्यात आल्या. चोरट्यांनी रात्री दोन ते पहाटे पाच दरम्यान चोरीचा प्रयत्न केला. यामध्ये दोन लाखांहून अधिक रकमेचा ऐवज लांबविल्याचा प्राथमिक ऐवज आहे. बुधवारी सकाळी चोरीची माहिती मिळताच चिपळूण पोलिस घटनास्थळी दाखल झाले. दुपारी श्‍वानपथक व ठसेतज्ज्ञांना पाचारण करण्यात आले. प्रभारी उपविभागीय पोलिस अधिकारी गणेश इंगळे, पोलिस निरीक्षक इंद्रजित काटकर यांनी घटनास्थळी भेट दिली व सदनिका धारकांशी चर्चा केली. सायंकाळी उशिरापर्यंत या प्रकरणी पोलिसांत तक्रार नोंदविण्याची कार्यवाही सुरू होती. मात्र, या चोर्‍यांमुळे परिसरातील नागरिकांमध्ये घबराट पसरली असून सुट्टीमध्ये बाहेर जायचे नाही का? असा सवाल सदनिकाधारक करीत आहेत.