Tue, Jul 16, 2019 02:21होमपेज › Konkan › मालवणात चोरट्यांचा धुमाकूळ

मालवणात चोरट्यांचा धुमाकूळ

Published On: May 10 2018 1:36AM | Last Updated: May 09 2018 11:23PMमालवण : प्रतिनिधी 

मालवण शहरात अज्ञात चोरट्यानी मंगळवारी मध्यरात्री तीन दुकाने फोडून लाखोंचा माल लंपास केला. यात फोटोग्राफर समीर म्हाडगुत यांच्या भरड येथील फोटो स्टुडिओत शिरकाव करून लाखो किमतीचे कॅमेरे व फोटोग्राफी साहित्य चोरून नेले. तर फोटोग्राफर गणेश गावकर यांच्या भरड नाका येथील स्टुडिओ फोडण्याचा चोरट्यानी अयशस्वी प्रयत्न केला. तसेच भरड बाजारपेठ येथील सर्वेश   पाटकर यांच्या बीअर शॉपीमध्येही शिरकाव करून एकूण 11 हजार रुपये किमतीचे दोन मोबाईल लंपास केले. दोन ठिकाणच्या चोरीमध्ये एकूण 2 लाख 87 हजार 750 रुपयांचा मुद्देमाल चोरीस गेला. या तिन्ही चोर्‍या दुकानांच्या दरवाजाचे कुलूप व कडी उचकटून आत प्रवेश करून करण्यात आल्या आहेत.

याबाबत फोटोग्राफर समीर म्हाडगुत, गणेश गावकर व बीअर शॉपीचे मालक सर्वेश पाटकर यांनी मालवण पोलिस स्थानकात तक्रार दाखल केली. मालवण भरड येथे समीर म्हाडगुत यांचा घरानजीकच समीर कम्युनिकेशन हा फोटो स्टुडिओ आहे. फोटोग्राफीसाठी आवश्यक कॅमेरे, प्रिंटर, कॉम्प्युटर व इतर साहित्य म्हाडगुत यांनी आपल्या स्टुडिओत ठेवले होते. सध्या लग्‍नाचा हंगाम सुरू असल्याने मंगळवारी रात्री रात्री 11.30 वा. त्यांनी स्टुडिओ बंद करत शटरला आतून कुलूप घालून मागील लाकडी दरवाजाला बाहेरून कुलूप लावून ते घरी गेले. बुधवारी सकाळी 9.30 वा. च्या सुमारास म्हाडगुत यांचा मुलगा करण स्टुडिओ उघडण्यास गेला असता स्टुडिओच्या मागील दरवाजाचे कुलूप नसल्याचे व कडी कोयंडा कापलेला  दिसून आले.

हा प्रकार करण याने म्हाडगुत यांना सांगितल्यावर त्यांनी स्टुडिओत जाऊन पाहिले असता आतील साहित्य विस्कटलेले व अस्ताव्यस्त पडलेले दिसून आले. तासेच स्टुडिओतील कॅमेरे व इतर फोटोग्राफी साहित्य चोरीस गेल्याचे  लक्षात आले. यानंतर  त्यांनी पोलिसांना पाचारण केले. पोलिसांनी स्टुडिओ व कडी कोयंडा उचकटलेल्या दरवाजाची पाहणी केली. स्टुडिओमधील दीड लाख रुपये किमतीचा एक निकॉन डीएसएलआर कॅमेरा (लेन्स व बॅग सहित), निकॉन कंपनीचा एक कॅमेरा- 15 हजार रुपये,  पॅनासॉनिक कंपनीचा एक कॅमेरा- 15 हजार रुपये, दोन लेन्स - 15 हजार रुपये, तीन फ्लॅशगन - 7 हजार रुपये, कॅमेरा स्ट्रीगर - 750 रुपये, कॅमेरा चार्जर - 2 हजार रुपये, 7 ते 8 मेमरी कार्ड -3 हजार रुपये, पाच डोंगल सॉफ्टवेअर - 68 हजार, तीन पेन ड्राइव- 500 रुपये, आणि रोख रक्कम रु. 500 असे एकूण 2 लाख 76 हजार 750 रुपयांचे साहित्य चोरट्यानी लंपास केले.

भरड येथील सर्वेश गोपाळ पाटकर यांच्या बिअर शॉपीच्या दरवाजाची कडी उचकटून आत प्रवेश करून पाटकर कुटुंबीय झोपलेल्या ठिकाणाहून 11 हजार किंमतीचे दोन मोबाईल लंपास केले. रात्री जाग आल्यावर सर्वेश हे आपलं मोबाईल शोधत असताना त्यांना शॉपीचा दरवाजा उचकटून टाकल्याचे दिसून आल्याने मोबाईल चोरीस गेल्याचे त्यांना समजले. तर चोरट्यानी भरड नाका येथील फोटोग्राफर गणेश गावकर यांच्या फोटो स्टुडिओचा लाकडी फळ्यांचा दरवाजा फोडला. मात्र आतील काचेचा दरवाजा उघडण्यात चोरट्यांना अपयश आल्याने त्यांचा प्रयत्न फसला.

दरम्यान, या चोरीचा तपास करताना मालवण पोलिसांनी सायंकाळी देवबाग तारकर्ली येथून फोटोग्राफी व्यवसाय करणार्‍या दोघा संशयित तरुणांना ताब्यात घेतले. हे तरुण उत्तर प्रदेश बिहार याभागातील असल्याचे पोलिसानी सांगितले. त्यांच्याकडील कॅमेरे व साहित्य याबाबत अधिक चौकशी सायंकाळी उशिरापर्यंत सुरू होती. 

सीसीटीव्ही बंद : दोघे ताब्यात

सुरक्षेच्या दृष्टीने शहरात बसविण्यात आलेले पोलिसांचे सीसीटीव्ही कॅमेरे बंद अवस्थेत असल्याने तीव्र संताप व्यक्‍त होत आहे. या चोरट्यांना पकडण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर आहे. दरम्यान, सायंकाळी पोलिसांनी देवबाग, तारकर्ली येथून फोटोग्राफी व्यवसाय करणार्‍या दोन परप्रांतीय संशयित तरुणांना ताब्यात घेतले. याबाबत उशिरापर्यंत पोलिसांकडून त्यांची चौकशी सुरू होती.