होमपेज › Konkan › पोलिसांवरील‘विश्‍वासा'चे पानिपत

पोलिसांवरील‘विश्‍वासा'चे पानिपत

Published On: May 15 2018 1:35AM | Last Updated: May 14 2018 10:52PMकुडाळ : प्रमोद म्हाडगुत

‘सदरक्षणाय खलनिग्रहणाय’ या ब्रीदवाक्याने काम करणार्‍या पोलिस दलाला कुडाळ तालुक्यातील निरूखे गावात पोलिस संरक्षणात तोतया पोलिसांनी टाकलेला दरोडा प्रकरणामुळे पोलिसांवरील विश्‍वासाचेच पानीपत  झाल्याची भावना सर्वसामान्यांमध्ये व्यक्‍त होत आहे. काही पोलिस प्रामाणिकपणे कर्तव्य बजावत असताना काही पोलिसांकडून मात्र अर्थपूर्ण व्यवहार केले जातात, अशा तक्रारी नेहमीच्याच आहेत. या प्रकरणामुळे अशा अर्थपूर्ण व्यवहारांचीही चर्चा सुरू झाली आहे. ज्या पोलिसांच्या संरक्षणात पुण्यातील त्या भामट्याने दरोडा घातला त्या पोलिसांवर त्यांच्या हलगर्जी व बेफिकीरपणाबद्दल कोणती आणि केव्हा कारवाई होणार? हा प्रश्‍न आता उपस्थित केला जात आहे. परिणामी आता कर्तव्यदक्ष पोलिस अधीक्षक दीक्षितकुमार गेडाम या प्रकरणात तोतया पोलिसांना धडा शिकवतील पण खाकी वर्दीतील शुक्राचार्यांना अद्दल घडवून पोलिसांच्या विश्‍वासाचे झालेले ‘पानिपत’ पुसण्यासाठी पुढाकार घेणार का? याकडे सिंधुदुर्गवासीयांचे लक्ष लागून राहिले आहे. 

खाकी वर्दी आणि पोलिस म्हटले की, प्रत्येकजण दचकतोच. परिणामी पोलिसांच्या वाटेला जाण्याची हिम्मत कुणी दाखवित नाही. पण व्यावसायिक असलेल्या निरूखे येथील रामदास करंदीकर यांनी आपल्या घरावरील छापानाट्यात आपली मोठी फसवणूक झाल्याची तक्रार पोलिस अधीक्षकांकडे केली. त्यानंतर पोलिस अधीक्षक श्री. गेडाम यांच्या आदेशाने हे प्रकरण उघडीस आले आहे. 

निरूखेतील या पोलिस संरक्षणातील बनावट छापामारीमुळे पोलिसांमधील गुन्हेगारी प्रवृत्तीविषयी आता सर्वसामान्य नागरिकांमध्ये उघडपणे चर्चा सुरू आहे. यापूर्वीही सिंधुदुर्ग जिल्ह्यात घडलेल्या काही घटनांमधून पोलिसांचे गुन्हेगार आणि अवैध व्यावसायिकांशी असलेले लागेबांधे वेळोवेळी स्पष्ट झाले आहेत. मात्र, पुणे येथील त्या तोतया अधिकार्‍याच्या पथकाला स्थानिक गुन्हा अन्वेषणच्या (एलसीबी) विभागातील पोलिसांची साथ मिळाल्यानंतर जो दरोडा घातला गेला त्यामुळे पोलिसांच्या विश्‍वासार्हतेवरच प्रश्‍नचिन्ह निर्माण झाले आहे. करंदीकर यांनी पोलिस अधीक्षकांकडे तक्रार अर्ज दिला म्हणूनच हा बनाव उघड झाला आणि तोतया पोलिस व त्यांना साथ देणारे खरे पोलिस तोंडघशी पडले. 

जिल्ह्यातील पोलिस ठाण्यातील पोलिसांवर बंदोबस्तासह अन्य कामांचा खूप ताण असतो. त्यामुळे या पोलिस ठाण्याकडील एखाद्या गुन्ह्याचा तपास प्रलंबित राहतो. अशावेळी तसेच गुंतागुंतीच्या बनलेल्या प्रकरणात सखोल तपास करण्यासाठी एलसीबीची भूमिका महत्त्वाची असते. यामुळे या विभागाच्या लोकांना बंदोबस्तासाठी पाठविले जात नाही. गुन्ह्यांची उकल लवकर होण्यासाठी त्यांनी काम करावे अशी अपेक्षा असते. मात्र, या प्रकरणात गुन्ह्याचा उकल सोडाच गुन्हेगारालाच एलसीबी विभागाने साथ दिल्याने सिंधुदुर्ग जिल्हा पोलिसांचे नाक तर कापलेच शिवाय महत्त्वाच्या अशा एलसीबीच्या मूळ संकल्पनेलाच या पोलिसांनी छेद दिला आहे. 

वास्तविक चोरी करणारा आणि त्याला साथ देणारा हे दोघेही चोर अन् दोषी असतात.  बनावट छापा प्रकरणात पुणे येथील माहिती अधिकारी कार्यकर्ता श्रीजीत रमेशन, पोलिस कर्मचारी अंगरक्षक मोरे, राज यादव, आनंद सदावर्ते, अनिल बनसोडे, इरफान अशा सहा जणांवर दरोडा घातल्याप्रकरणी कुडाळ पोलिस स्थानकात गुन्हा दाखल होवून पोलिस अधिक्षकांच्या आदेशाने त्यांच्या मागावर पथक पाठविण्यात आली आहे. तर मग एलसीबीचे पोलिस उपनिरीक्षक सुनिल पोवार व आठ कर्मचार्‍यांवर जो बेजबाबदारपणा व हलगर्जीपणा दाखविला त्यासंबंधी गुन्हा दाखल का नाही? त्यांनी सोयीस्कररित्या बाजूला ठेवले जात आहे का? असा सवाल आता उपस्थित केला जात आहे. 

या घटनेमुळे जिल्ह्याच्या पोलिस वर्तुळात खळबळ उडाली आहे. सायबर क्राईममधील गुन्हे हाताळताना कागदपत्रांची तपासणी केली जाते. पुण्यातील हे सहाजण आले तेव्हा त्यांची ओळखपत्रे का तपासली गेली नाहीत? जेव्हा 1 लाख 85 हजारांची रक्कम स्थानिक पोलिसांकडे देवून इतर रक्कम जेव्हा ते सहाजण घेवून गेले तेव्हा स्थानिक पोलिसांनी याची खबर तातडीने वरिष्ठांना का दिली नाही? या प्रश्‍नांची उत्तरे स्थानिक पोलिसांकडून मिळणे अपेक्षित आहे.  आता पोलिस अधीक्षक श्री. गेडाम यांना तोतया पोलिसांसह खाकी वर्दीतील पोलिसांवर कारवाई करण्याचे मोठे आव्हानच आहे. ते आव्हान कसे पेलतात व अशा प्रकरणात कितपत खोलवर जावून सर्वांचा पर्दापाश करतात, हे येत्या काही दिवसांत स्पष्ट होईल.

प्रामाणिक पोलिसांना याचा त्रास होण्याची शक्यता

निरूखे येथील लाकूड व्यावसायिक रामदास करंदिकर यांच्या घरावर पोलिस संरक्षणात छापा प्रकरणी तोतया पोलिसांनी सिंधुदुर्ग एलसीबी विभागाच्या पोलिस विभागाचा पोपट करत साडेपाच लाख रूपये लंपास केले. या प्रकरणात स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाचे उपनिरीक्षक स्वप्नील पवार व आठ कर्मचार्‍यांची पोलिस खात्याची बदनामी वाचविण्यासाठी वरवर चौकशी न करता सखोल चौकशी करण्याची गरज आहे. या प्रकरणामुळे पोलिस खात्याची बदनामी झाली. त्यामुळे त्याचा त्रास आता पोलिस खात्यातील प्रामाणिक अधिकारी आणि कर्मचार्‍यांनाही सहन करावा लागणार आहे.