Thu, Dec 12, 2019 08:14होमपेज › Konkan › सिंधुदुर्ग : दारिस्तेतील युवतीचा गडनदीत मृतदेह

सिंधुदुर्ग : दारिस्तेतील युवतीचा गडनदीत मृतदेह

Published On: Jul 23 2018 11:13PM | Last Updated: Jul 23 2018 11:13PMकणकवली : वार्ताहर

दारिस्ते-गुरववाडी येथील अंकिता रवींद्र गुरव (वय 20) या युवतीचा मृतदेह तेथीलच गडनदीच्या पात्रात अडकलेल्या स्थितीत आढळून आला. कणकवलीहून रविवारी दुपारी दारिस्तेत घरी जाण्यासाठी निघालेली ही युवती सायंकाळपर्यंत घरी न आल्याने तिचा शोध घेण्यात आला. सोमवारी सकाळी तिचा मृतदेह गडनदीतील डोहात झुडपांना अडकलेल्या स्थितीत आढळून आला. तिचा घातपात झाल्याचा संशय नातेवाईकांनी व्यक्‍त केला असून, रविवार सायंकाळपासून गावातून गायब झालेल्या एका व्यक्‍तीचा शोध ग्रामस्थांकडून घेतला जात आहे.

वर्षभरापूर्वी बारावीपर्यंतचे शिक्षण अंकिता हिने पूर्ण केले होते. पंधरा दिवसांपूर्वीच ती कणकवलीतील एका झेरॉक्स सेंटरवर नोकरीला लागली होती. रविवारी अर्धा दिवस सुट्टी असल्याने दुपारी 12.30 वा. ती झेरॉक्स सेंटरमधून घरी जाण्यासाठी बाहेर पडली. त्यानंतर खाजगी प्रवासी वाहनाने ती दिगवळे-गावडेवाडी येथील स्टॉपवर उतरली. दिगवळे व दारिस्ते गावांना जोडणार्‍या गडनदीवरील केटी बंधार्‍यावरून ती घरी निघाली होती. मात्र सायंकाळपर्यंत ती घरी पोहोचलीत नाही. त्यामुळे नातेवाईकांनी शोधाशोध सुरू केलीअसता बंधार्‍यापासून काही अंतरावर राहणार्‍या नागरीकांनी दुपारी 1.30 वा.च्या सुमारास नदीजवळ कुणीतरी ‘वाचवा वाचवा’ म्हणून ओरडत असल्याचे सांगितले. कदाचित बंधार्‍यावरून पलिकडे जात असताना पाय घसरून ती नदीत पडली असावी अशी शक्यता वाटल्याने नागरीकांनी शोधाशोध सुरू केली.

गडनदीजवळ शोध मोहीम सुरू असताना एका प्रत्यक्षदर्शीने अंकिता बुडत असताना त्या ठिकाणी एक व्यक्‍ती दिसल्याचे त्याने सांगितले. ती व्यक्‍ती  ओळखीची असल्याने चौकशी केली असता दुपारनंतर तो गावातून गायब असल्याचे समजले.काही नागरीकांनी त्याच्या नातेवाईकांकडे जावून चौकशी केली. मात्र त्यांचा शोध लागला नाही. त्यामुळे सोमवारी सकाळी दारिस्ते व दिगवळे येथील ग्रामस्थांनी गडनदीपात्रात शोध मोहीम राबविली असता बंधार्‍यापासून 300 मी. अंतरावर असलेल्या लोंढा-फळसकोंड येथील शेरणीच्या झुडपांना अडकलेल्या स्थितीत अंकिताचा मृतदेह आढळून आला. सकाळी 8 वा. च्या सुमारास आढळलेला मृतदेह नागरीकांनी बाहेर काढला. शोध मोहिमेत दशरत सुतार, संजय गुरव, भरत दारिस्तेकर, महेश मेस्त्री, सुनील  मेस्त्री, मंगेश  मेस्त्री, चेतन गुरव, गणेश गुरव, बापू तावडे, सुभाष देवळी आदींसह दारिस्ते व दिगवळे गावातील अनेकांनी सहभाग घेतला. 

अंकिता बेपत्ता असल्याची खबर तिच्या नातेवाईकांनी रविवारी सायंकाळी कणकवली पोलिसांना दिली होती. त्यानंतर कणकवली पोलिसांनी रात्री दारिस्ते गावात जावून माहिती घेतली. सोमवारी सकाळी कणकवलीचे नायब तहसीलदार आर.एन. कडुलकर, दारिस्ते सरपंच संजय सावंत, उपसरपंच संजय गावकर, सांगवे मंडळ अधिकारी सौ. प्रभू, तलाठी बी.डी. परब, ग्रामसेवक दत्तात्रय कवठकर, दिगवळे ग्रामसेवक आतिश बर्वे, पोलिस पाटील हेमंत सावंत आदींनी शोध मोहिमेस सहकार्य केले. अंकिता हिचा मृतदेह सोमवारी सकाळी शवविच्छेदनासाठी कणकवली उपजिल्हा रूग्णालयात आणण्यात आला होता. पाण्यात बुडून अंकिताचा मृत्यू झाल्याचे शवविच्छेदन अहवालात स्पष्ट झाले आहे. तरीही यामागे काही घातपात  आहे का? यादृष्टीने पोलिस तपास करत आहेत.

अंकिता बुडत असतानाची घटना पाहिलेल्या त्या युवकाने ही घटना पाहिल्यानंतर आजूबाजूच्या नागरीकांना याची खबर दिली. त्यानंतर काहीजणांनी धावत बंधार्‍यावर जावून पाहणी केली होती. मात्र तिथे कुणीही आढळून आलेले नाही. अंकिता ही नेहमीच त्या बंधार्‍यावरून घरी जायची. त्यामुळे ती घसरून पडणे शक्य नसल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. शिवाय बंधार्‍यावरील वाटही निसरडी नाही. अंकिता नदीत पडली की यामागे काही घातपात आहे  याचा शोध कणकवली पोलिस करत आहेत. याप्रकरणी अधिक तपास कणकवलीचे पोलिस निरीक्षक शिवाजी कोळी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक धनंजय चव्हाण करत आहेत. अंकिता हिच्या पश्‍चात आई, वडील, आजी, आजोबा, दोन भाऊ, बहिण, काका असा परिवार आहे.