होमपेज › Konkan › तेंडोलीत आग विझविताना एक जण होरपळला

तेंडोलीत आग विझविताना एक जण होरपळला

Published On: May 17 2018 1:27AM | Last Updated: May 17 2018 1:04AMकुडाळ : प्रतिनिधी

तेंडोली-कुंभारवाडी येथील बागांना बुधवारी दुपारी 2 वा. च्या सुमारास अचानक आग लागली. या आगीची वार्ता कुंभार कुटुंबीयांना समजताच घरातील ब्राम्हण भोजन टाकून कुंभार बंधू आग विझविण्यासाठी गेले. आग विझविताना महादेव  नारायण कुंभार (वय 50) हे आगीत  होरपळून खाली पडले तर त्यांचे दुसरे दोन बंधू आग विझवित पुढे गेले. त्यांना भाऊ आगीत होरपळल्याचे समजले नाही. मागाहून असलेल्या कुटुंबातील अन्य सदस्यांना होरपळलेल्या स्थितीत महादेव कुंभार मिळाल्याने त्यांना तत्काळ कुडाळ ग्रामीण येथे हलविले. तिथे प्राथमिक उपचार करून अधिक उपचारासाठी गोवा-बांबुळी येथे हलविण्यात आले.

तेंडोली-कुंभारवाडी येथे सायमन डिसोजा, किशोर मुननकर, सुभाष परब, प्रकाश राऊळ, रमेश सावंत व भास्कर कुंभार यांची जवळजवळ 25 एकर क्षेत्रात आंबा-काजूच्या बागा आहेत. कुंभार यांच्या घरापासून अर्धा कि. मी. अंतरावर असलेल्या या बागांना आग लागल्याची माहिती  शेजार्‍यांकडून कुंभार कुटुंबीयांना देण्यात आली. ही वार्ता ऐकताच मुंबईहून आठ दिवसांपूर्वी गावी आलेले कॉटन कार्पोरेशन ऑफ इंडियामध्ये कार्यरत असलेले महादेव नारायण कुंभार, शिक्षक रामचंद्र नारायण कुंभार (40) व उत्तम  नारायण कुंभार (60) हे तिघेजण बंधू  बागेतील आग विझविण्यासाठी धावून गेले. काही वेळात बाजूच्या बागेत कार्यरत कामगार अनिल परब हा कुंभार यांच्या घरी धावत आला आणि त्याने महादेव कुंभार आगीत होरपळले त्यांना मी बाजूला काढले असल्याचे सांगितले. ही बातमी ऐकून शेजार्‍यांसह त्यांचे भाऊ भास्कर नारायण कुंभार बागेच्या दिशेने धावले असता समोर भाऊ महादेव कुंभार हा आगीत होरपळून तळमळत असलेला दिसला. त्यांना तत्काळ कुडाळात आणले जात होते.

एवढ्यात  समोरून शिवसेनेचे उपतालुका प्रमुख संदीप राऊळ  घरी  तेंडोलीच्या दिशेने जात होते. त्यांना टेम्पोतील मंडळींनी हात दाखवून थांबवित महादेव कुंभार यांना स्कॉर्पिओ गाडीत ठेवले. दरम्यान संदीप राऊळ यांची स्कॉर्पीओ पंक्‍चर झाली, मात्र प्रसंगावधान राखत त्यांनी महादेव कुंभार यांना कुडाळ ग्रामीण रुग्णालयात  दाखल केले. ग्रामीण रुग्णालयात डॉ. गौरव घुर्ये, डॉ. सौ. एस.पी.पाटील यांनी प्राथमिक उपचार  केले व अधिक उपचारासाठी गोवा-बांबुळी येथे हलविण्यात आले. या घटनेची माहिती समजताच  उपसभापती सौ. श्रेया परब, तेंडोली जि.प.सदस्य वर्षा कुडाळकर यांनी ग्रामीण रुग्णालयात धाव घेत डॉक्टर व 108 ग्णवाहिकेसाठी संपर्क साधला.